पासपोर्ट तयार ठेवा, हल्ला करुन अफगाणमध्ये पळून जा
By admin | Published: January 28, 2016 01:33 AM2016-01-28T01:33:54+5:302016-01-28T01:33:54+5:30
पासपोर्ट तयार ठेवा. भारतात हल्ला करुन अफगाणिस्तानमध्ये पलायन करा आणि इसिसमध्ये सहभागी व्हा. हा सल्ला देण्यात आला होता त्या तरुणांना ज्यांना मागील आठवड्यात अटक करण्यात आली आहे.
- डिप्पी वांकाणी, मुंबई
पासपोर्ट तयार ठेवा. भारतात हल्ला करुन अफगाणिस्तानमध्ये पलायन करा आणि इसिसमध्ये सहभागी व्हा. हा सल्ला देण्यात आला होता त्या तरुणांना ज्यांना मागील आठवड्यात अटक करण्यात आली आहे. लखनौमध्ये याबाबत एक बैठकही झाली होती, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.
दक्षिण मुंबईतील जे.जे. रोड भागातील दोन हवाला आॅपरेटरर्सची ओळख पटली आहे. ज्यांनी या प्रकरणात आर्थिक व्यवहार केला आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली.
मागील आठवड्यात ज्यांना अटक करण्यात आली आहे त्यात प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील रिझवान उर्फ निवाजुद्दिन व मोहम्मद अलीम यांचा समावेश आहे. तर मुंबईच्या मुदब्बीर शेखवर तरुणांची भरती करण्याची जबाबदारी होती. तो लखनौला अलीमच्या घरीही जाउन आला होता अशी माहिती समोर येत आहे. नवीन भरती करतांना पासपोर्ट असलेल्या तरुणांचा शोध घ्यायचा असेही ठरविण्यात आले होते.
जर या तिघांना काही तत्काळ काम सोपविलेले नसेल तर शफी अम्मार उर्फ यूसूफ हा त्यांना आॅनलाइन प्रशिक्षण देणार होता. आदेशाची प्रतीक्षा करा, असेही त्यांना सांगण्यात आले होते. इराक किंवा अफगाणिस्तानात त्यांना इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी पाठविण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते.
एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, जे.जे. रोड वरील दोन दुकान मालकांची चौकशी केली जात आहे. त्यांनी हवालाच्या माध्यमातून मुदब्बीरला पैसे दिल्याचा आरोप आहे. तरी, दुकान मालकांचा या सर्व प्रकरणात कितपत सहभाग आहे यावरच त्यांची अटक अवलंबून असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
मालवणी प्रकरणात एटीएसने रिझवानची (२१) कोठडी मिळविली आहे. त्याचे वडील उत्तरप्रदेशात सरकारी कर्मचारी आहेत. लखनौच्या एका महाविद्यालयात रिझवानचा १२ वीला प्रवेश करुन देण्यात आला होता. तो एकदा मालवणीतील चार तरुणांना भेटायला व दुसऱ्यांदा मोठ्या प्रमाणात मालवणीतील तरुणांच्या भरतीबाबत मुंबईत आला होता.
तो रडारवर नाही : रेहमान हा या प्रकरणात सहभागी नसल्याचे दिसून येत असल्यामुळे तो आता पोलिसांच्या रडारवर नाही. त्याच्याशी संबंधित माहिती घेतल्यानंतरच हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.