Devendra Fadnavis: “तुमच्या हृदयात प्राची वहिनींना ठेवा, अजून कुणाला ठेवलेले आम्ही खपवून घेणार नाही”
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 05:08 PM2021-09-01T17:08:26+5:302021-09-01T17:09:00+5:30
नरेंद्र पाटील यांनी त्यांच्या हातावर देवेंद्र नावाचा टॅटू काढलाय. देवेंद्र फडणवीस यांचे चाहते म्हणून नरेंद्र पाटलांनी हा टॅटू कोरून घेतला आहे.
नवी मुंबई – राज्यात शिवसेना-भाजपानं लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र लढवली. त्यानंतर मुख्यमंत्री पदावरून या दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला. शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत राज्यात महाविकास आघाडीची स्थापना केली. यातच लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजपातील अनेक नेत्यांनी सोयीस्करपणे एकमेकांच्या पक्षात प्रवेश केले होते. त्यातील एक नाव म्हणजे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील.
देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक असणाऱ्या नरेंद्र पाटील(Narendra Patil) शिवसेनेत प्रवेश करून सातारा लोकसभा निवडणूक लढवली. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाल्यानंतरही नरेंद्र पाटील यांनी फडणवीसांची साथ सोडली नाही. नरेंद्र पाटील यांचं फडणवीसांवर इतकं प्रेम आहे की, त्यांनी स्वत:च्या हातावर देवेंद्र नावाचा टॅटू काढला आहे. या टॅटूची चर्चा बरीच झाली परंतु ज्याच्या नावानं हा टॅटू काढला होता त्या देवेंद्र फडणवीसांनी(Devendra Fadnavis) पहिल्यांदाच यावर भाष्य केले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुमच्या ह्दयात प्राची वहिनींना ठेवा, अजून कुणाला ठेवलेले आम्ही खपवून घेणार नाही. आम्हाला तुम्ही डोक्यात ठेवा, प्रार्थनेत ठेवा, आशीर्वादात ठेवा अशी प्रतिक्रिया देताना उपस्थितांमध्ये हशा पिकला. नवी मुंबई माथाडी कामगारांच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. नरेंद्र पाटील यांनी त्यांच्या हातावर देवेंद्र नावाचा टॅटू काढलाय. देवेंद्र फडणवीस यांचे चाहते म्हणून नरेंद्र पाटलांनी हा टॅटू कोरून घेतला आहे.
नरेंद्र पाटलांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र
अलीकडेच माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत आपली वेगळी चूल मांडली. मी पक्षात राहू नये असे काही नेत्यांना वाटत असल्याने मी शिवसेना सोडत असल्याचे त्यांनी म्हटले होते. तर, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे मैत्रीचे संबंध असल्याचे त्यांनी वारंवार बोलून दाखवले आहे. नुकतेच त्यांनी आपल्या हातावर देवेंद्र हे नावच गोंदून घेतलं आहे. नरेंद्र पाटील सध्या मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठीही पुढाकार घेऊन सभा आणि बैठकांना उपस्थिती लावत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात चांगले संबंध आहेत ते शिवसेनेच्या नेत्यांना खूपत होते. तसेच मी शिवसेनेत राहू नये असे पक्षातील नेत्यांना वाटत असल्याने मी शिवसेना सोडण्याता निर्णय घेत आहे, असे नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा करताना सांगितले. त्यानंतर, त्यांनी कुठल्याही पक्षात प्रवेश केला नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने ते सातत्याने बोलताना दिसले आहेत. फडणवीस यांच्यावरील त्यांचं प्रेम अनेकदा शब्दातून व्यक्त झालंय. आता चक्क देवेंद्र नावाचा टॅटूच त्यांनी कोरलाय.