Abhijit Bichukale: 'माझ्या वाढदिनी, २८ नोव्हेंबरला सातारा बंद ठेवा'; कोश्यारींच्या वक्तव्यावरून बिचुकलेंचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 08:20 PM2022-11-25T20:20:54+5:302022-11-25T20:21:43+5:30
कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांची जी काही तुलना केली, शुल्लक लोकांशी केली त्यामुळे महाराजांचा अपमान झाला आहे, असे बिचुकले म्हणाले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरून केलेल्या वक्तव्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या दोन दिवसांत सर्वपक्षीयांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र बंद ठेवण्याबद्दल ठरवू असे म्हटले होते. यानंतर महाराष्ट्रातील हाय प्रोफाईल नेते म्हणून ओळखले जाणारे अभिजित बिचुकले यांनी २८ नोव्हेंबरला सातारा बंद ठेवण्याचे आवाहन सातारकरांना केले आहे.
कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांची जी काही तुलना केली, शुल्लक लोकांशी केली त्यामुळे महाराजांचा अपमान झाला आहे. लायकी नसलेल्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर करणे म्हणजे महाराजांचा घोर अपमान आहे. कोश्यारींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचाही एकेरी उल्लेख करत अपमान केला आहे. यामुळे मी समस्त सातारकरांना आवाहन करतोय की, येत्या २८ नोव्हेंबरला माझा वाढदिवस आहे, त्या वाढदिनी सातारा जिल्हा बंद ठेवावा, असे बिचुकलेंनी म्हटले आहे.
अनेक पक्षांनी महाराजांच्या नावाचा वापर करत पक्ष वाढवला. आता त्याच पक्षांतील काही संविधानिक पदावरील व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरून त्यांचा अवमान करत असेल, तर मी गप्प बसणार नाही. या पुढे असे कोणी वक्तव्य केल्यास मी त्याला ठोकून काढीन, असा इशाराही बिचुकलेंनी दिला आहे.
याचबरोबर गोपीचंद पडळकर यांनी आंबेडकरांबद्दल अपशब्द वापरले आहेत, त्यांचा फडणवीसांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.