काही गोष्टी पडद्याआड राहू द्या..!
By admin | Published: February 10, 2016 12:50 AM2016-02-10T00:50:51+5:302016-02-10T00:50:51+5:30
माझ्याकडे रेड पडली आणि २४ तास झाले, तरीही नोटांची मोजणी चालू आहे, अशा बातम्या काहींनी छापल्या, पण काहीही सापडलेले नाही. ज्यांना गरमागरम न्यूज हव्या असतात, अशांनाही काही
माझ्याकडे रेड पडली आणि २४ तास झाले, तरीही नोटांची मोजणी चालू आहे, अशा बातम्या काहींनी छापल्या, पण काहीही सापडलेले नाही. ज्यांना गरमागरम न्यूज हव्या असतात, अशांनाही काही सापडले नाही, असा टोलाही भुजबळ यांनी लगावला. मी शरद पवार यांचा आभारी आहे, असेही भुजबळ म्हणाले. मी परदेशात असताना त्यांनी माझी बाजू मांडली. समता परिषदेचाही मी आभारी आहे. राष्ट्रवादीच नाही, तर अन्य पक्षातील जे कोणी माझ्या पाठीशी उभे राहिले, त्या सगळ्यांचा मी आभारी आहे, असे ते म्हणाले. शिवसेनेतून आपल्याला कोणी फोन केला होता, असा सवाल केला असता, भुजबळ उद्गारले, ‘काही गोष्टी पडद्याआडच राहू द्या ना, सगळंच कशाला विचारता...’ आणि जोरदार हंशा पिकला.
चमणकरांना रुपयाही दिलेला नाही
मुंबईसाठी एसआरएची स्कीम २००३ साली मंजूर झाली, त्या वेळी मी बांधकाममंत्री नव्हतो. मात्र, ज्या वेळी ही योजना करायचे ठरले, त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दोन-तीन बैठका झाल्या. आरटीओचीही जागा जवळ होती. त्यामुळे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचा ट्रॅक करण्याची मागणी केली. त्याच वेळी महाराष्ट्र सदनाचा विषय चर्चेला आला. ते कामही चमणकर यांच्या कंपनीकडून करून
घेण्याचे ठरले. विधी व न्याय,
वित्त, गृह, नगरविकास अशा
सगळ्या विभागाच्या सचिवांनी हा प्रस्ताव तपासला होता. तेव्हा मुंबईतील हायमाउंट इमारतही बांधायचे ठरले. त्या पोटी कोणताही भूखंड द्यायचा नव्हता किंवा पैसे द्यायचे नव्हते. उलट चमणकरांनी जागा घेऊन १००० घरे ट्रांझिट कॅम्पसाठी म्हणून बांधून द्यायची होती. या बदल्यात त्यांना एफएसआय द्यायचा होता. आजपर्यंत चमणकरांना एक रुपयाही दिलेला नाही. यासाठीची फाईल दोनदा तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे गेली.
इंडियाबुलने चेकने पैसे दिले
कलिना येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे गं्रथालय बीओटीवर बांधण्यासाठीचा प्रस्ताव होता. तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या समितीने त्याचे टेंडर काढले. जो चांगला होता, त्याला ते काम दिले. त्याचीही फाईल मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे गेली. दोन वेळा फाईल गेली त्यांच्याकडे. त्यातून इंडियाबुलला काम मिळाले. नाशिकला तेव्हा फेस्टिवल सुरू होते. इंडियाबुलने त्यासाठी प्रायोजक म्हणून चेकने पैसे दिले. त्यातून खेळाच्या स्पर्धा झाल्या. सिनेकलावंतांचे कार्यक्रम झाले. तो पैसा भुजबळांना दिलेला नव्हता. मात्र, खा. किरीट सोमय्या यांनी पीआयएल केली. सगळे निर्णय कॅबिनेट सबकमिटीने घेतलेले असताना, विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुली चौकशी लावली. आम्ही एसीबीला पूर्ण सहकार्य केले. आमच्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. यात भ्रष्टाचार, अनियमितता झालेली नाही, हेदेखील लक्षात येईल.
तरीही रेड टाकली व अटक केली
ईडीने उच्च न्यायालयात सांगितले की, समीर व आमचे लोक चौकशीला सहकार्य करायला तयार नाहीत, हे चूक होते. त्यांनी आम्हाला १५ वर्षांपासूनची कागदपत्रे मागितली. इतकी जुनी कागदपत्रे देण्यासाठी वेळ लागणारच. आम्ही वेळ मागून घेतला होता. सगळी कागदपत्रे जमा झाल्यानंतर समीरने स्वत:हून ईडीला पत्र पाठवले. सोमवारी आपण कागदपत्रे घेऊन यायला तयार आहोत, असे सांगितले असताना, १ फेब्रुवारीला रेड झाली. समीरला अटक करण्यात आली. सगळ्या मालमत्ता हजारो कोटींच्या आहेत, असे सांगितले जाते, पण इमारती बांधून पूर्ण झाल्यानंतर व विकल्यानंतर नफा होईल की, आधीच नफा होतो?
खारघरला जमीन घेतली होती!
समीरने खारघरला थोडी-थोडी जमीन घेतली होती. त्यावर त्याने एक स्कीम सुरू केली. बुकिंग सुरू केले. त्यासाठी पैसे लागणार होते. आमचे सीए कंपन्या तयार करत होते. काही कंपन्या इक्विटी घेतात व पुढे होणाऱ्या फायद्यात त्यांना हिस्सा मिळतो. असा व्यवहार सगळ्याच कंपन्या करतात. त्यातील ९ इमारतींचे काम प्लिंथ लेव्हलपर्यंत पूर्णही झाले आहे. दरम्यान, हे सगळे घडले. खारघरची जमीन आमची कशी होऊ शकते, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर फायदा किती होईल, हे कळेल. सगळीकडे हेच सर्रास चालते. आम्ही जे केले, ते नियमात बसवून केले, यात कोठे फसवाफसवी केली नाही, तरीही रेड टाकल्या गेल्या.
दिल्लीतले महाराष्ट्र सदन अत्यंत चांगले झाले आहे. त्यावर अपेक्षेपेक्षा जास्त पैसा खर्च झाला, पण खर्च कितीही वाढला, तरीही एफएसआयखेरीज त्यांना काहीही द्यायचे नव्हते. जे चांगले काम झाले, त्याबद्दल कोणीच काही बोलत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ परदेशी असताना माजी खासदार समीर भुजबळ यांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर राज्यभर भुजबळ समर्थकांनी आदोलने केली. मंगळवारी मायदेशी परतलेल्या छगन भुजबळ यांना पाठिंबा देण्यासाठी भुजबळ समर्थकांनी मंगळवारी मुंबईच्या विमानतळावर जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या वेळी भुजबळ यांनी कायदेशीर लढाई लढणार असल्याचे सांगत, कार्यकर्त्यांना शांतता ठेवण्याचे आवाहन केले.
समीर आणि पंकज भुजबळ यांच्यासह छगन भुजबळ यांच्या मालमत्तांवर छापे टाकल्यानंतर ईडीचा चौकशीचा ससेमिरा भुजबळ कुटुंबीयांच्या मागे लागला आहे. अशा परिस्थितीत नेत्याला पाठिंबा देण्यासाठी नाशिक, नांदगाव, येवला आणि मुंबईतील भुजबळ समर्थक आणि पुण्यातील समता परिषदेचे कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच विमानतळावर मोठ्या संख्येने गर्दी केली होती. भुजबळ विमानतळावर दाखल होताच, कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, म्हणून विमानतळावर दाखल होताच, भुजबळ यांनी प्रथम कार्यकर्त्यांचे आभार मानत कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
समर्थकांना आवाहन करताना भुजबळ म्हणाले की, ‘कोणतेही चुकीचे काम केले नसल्याने सरकारविरोधात कायदेशीर लढाई लढणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी धीराने घेत कोणताही गोंधळ घालू नये. या लढ्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार भुजबळ कुटुंबाच्या पाठिशी असल्याने मी कोणालाही घाबरत नाही,’ असेही ते म्हणाले.
भुजबळांना रिसिव्ह करायला आव्हाड :
ओबीसी नेते छगन भुजबळ जेव्हा राष्ट्रवादी भवनाकडे येत होते, तेव्हा दुसरे ओबीसी नेते जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी भवनच्या मुख्य प्रवेशद्वारावर कार्यकर्त्यांसह उभे होते. भुजबळ येताच नारे देत, त्यांना राष्ट्रवादी भवनमध्ये नेण्यात आले. तेथे अँटिचेंबरमध्ये आधी भुजबळ, आव्हाड, नवाब मलिक यांच्यात गुफ्तगू झाले.
संगीत खुर्ची रंगली : पत्रकार परिषदेत संगीत खुर्चीचा खेळ रंगला. एरव्ही कोणत्याही बड्या नेत्यांची पत्रकार परिषद असली की, त्या नेत्याची खुर्ची सोडून उरलेल्या खुर्च्या बळकवणारे नेते आज एकाही खुर्चीवर बसायला तयार नव्हते. आम्ही येथे आहोत, यातच सगळे काही आले, असे उत्तर पत्रकारांना प्रमोद हिंदुराव यांनी दिले. काही वेळाने नवाब मलिक आले आणि एका खुर्चीवर बसले. त्यांंनी जवळच्या खुर्चीवर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांना बसवले. नंतर हिंदुराव बसले, काही वेळाने आ. जितेंद्र आव्हाड येऊन बसले. नंतर उपसभापती वसंत डावखरे येऊन भुजबळांच्या जवळ बसताच आव्हाड उठून बाहेर गेले. हा खेळ बराच वेळ रंगला.
पत्रकारांच्या प्रश्नांना भुजबळांची उत्तरे...
- आपण ओबीसी आहोत, म्हणून आपल्याला लक्ष्य केले जात आहे का?
असे मी म्हणालो नाही, माझ्या तोंडी असे काही टाकू नका.
- सीएने चुका केल्या असे समीर म्हणाल्याचे छापून आले आहे. त्यात काय खरे आहे?
- मला त्याची कल्पना नाही. तसे काही असेल असे वाटत नाही. आमची कागदपत्रे तयार आहेत असे समीरनेच कळवले होते. तरीही रेड टाकून अटक केली गेली.
- मनी लाँड्रिंगबद्दल सतत बोलले जात आहे. त्याचे काय?
मनी लाँड्रिंग कुठेही नाही. इक्विटी घेतली गेली. एकट्या समीरनेच हे केले असे नाही, तर इक्विटी घेऊन, देऊन व्यवसायात पैसा उभा केला जातो.
- तेलगीपासून या घोटाळ्यापर्यंत आर्थिक घोटाळ्यात नेहमी भुजबळांचेच नाव का येते?
तेलगीच्या वेळी सीबीआयने चौकशी केली होती. त्याही वेळी मला टार्गेट केले गेले, पण त्यात कुठेही माझे नाव नव्हते. आताही तेच होत आहे. आताही आम्हाला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे.
- आपण परदेशातून एक व्हॉट्सअप केला होता. त्यात खंजीर खुपसला असे चित्र व वाक्य होते. तुमचा इशारा कोणाकडे आहे?
माझा इशारा कोणाकडेही नाही. माझ्या पक्षाच्या कोणत्याही नेत्याकडे मी इशारा केलेला नाही. माझा पक्ष माझ्यासोबत उभा आहे, पण काही आहेत... ते नंतर कधी बोलू...
- आपल्या पक्षाचे अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या आरोपावरून लक्ष्य विचलित व्हावे, म्हणून आपल्यावर हल्ले होत आहेत का?
असे तुम्हाला (पत्रकारांना) वाटते, मला नाही...
- केंद्राचे नेते आपल्या पाठीमागे लागले आहेत की राज्यातले?
कोणीही पाठीमागे लागलेले नाही, सगळे माझ्या पाठीशी आहेत...
- किरीट सोमय्या आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत की मुख्यमंत्री फडणवीस?
कोणीही नाही... किरीट सोमय्या यांचा मुलगा जखमी झाला, की आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, अशा बातम्या मी वाचल्या. पोटच्या मुलाला वेदना झाल्या की काय होते, हे आता सोमय्या यांना कळाले असेल... त्यांचा मुलगा लवकर बरा व्हावा, त्याला दीर्घायुष्य लाभावे, अशी मी प्रार्थना करतो...
- ८७० कोटींचे नुकसान झाल्याचा निष्कर्ष इडीने काढला आहे त्याचे काय?
तेवढे तर सोडाच, २०० ते ३०० कोटीसुद्धा नुकसान झालेले नाही. सगळ्या फायली आहेत ना तुमच्याकडे... पहा व तपासा.
- इंडोनेशियात आपण गुंतवणूक केली होती त्याचे काय?
इंडोनेशियात कोळशाच्या खाणीसाठी आम्ही त्या वेळी १८ ते १९ कोटी रुपये नेले होते. ते देखील आरबीआयच्या परवानगीने. निर्णय होतील असे वाटत नव्हते, म्हणून मीच नव्हे, तर टाटा व इतर कंपन्यांनीदेखील आपली गुंतवणूक करायची की नाही, यावर चर्चा सुरू ठेवली आहे.
- किरीट सोमय्या बोलतात तसे होते, याबद्दल काय सांगाल?
मी काय सांगणार? ज्यांनी क्लीन चीट दिली, त्यांच्या सह्या आहेत. १ महिना तीन दिवस फायल पडून होती. एसीबीकडे एका दिवसात दुसरा अहवाल कसा जातो, हे तपासून घ्यायला हवे.
बाळासाहेबांना अटक, ही काय भुजबळांनी दिलेली गुरुदक्षिणा होती का? - अनिल गोटे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वयाचा विचार न करता आणि त्यांचे उपकार विसरून त्यांना अटक केली, तेव्हा ‘स्टील मॅन’ अशी पाठ थोपटून घेताना भुजबळांनी केलेली वर्तणूक ही बाळासाहेबांना दिलेले गुरुदक्षिणा होती का? तेलगी प्रकरणी माझा कोणताही संबंध नाही, हे न्यायालयाने मान्य करूनही मात्र, मला भुजबळांनी अटक करायला लावली, तेव्हा भुजबळांची ती सूडबुद्धी नव्हती का? असे संतप्त सवाल आ. अनिल गोटे यांनी केले आहेत.
समीर आणि पंकजचा यात काहीही संबंध नाही. सर्व खुलासे ते करत आहेत. तेलगी प्रकरणात मी रामटेकवर भुजबळांना भेटायला गेलो होतो. मी गुन्हा केला असेन, तर जरूर अटक करा, पण मुलाच्या बोगस सह्या करून तेलगीच्या कारखान्याची भागीदारी दाखवू नका, असे मी हात जोडून सांगत होतो, तेव्हा कायदा आपले काम करेल... असे उत्तर याच भुजबळांनी दिले होते, याची आठवणही आ. गोटे यांनी त्यात करून दिली.