वंजारी समाजात एकी ठेवा
By Admin | Published: June 8, 2017 01:31 AM2017-06-08T01:31:28+5:302017-06-08T01:31:28+5:30
वंजारी समाजात विविध संघटना स्थापन होऊ लागल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : वंजारी समाजात विविध संघटना स्थापन होऊ लागल्या आहेत. ही चांगली बाब आहे. परंतु, एकमेकांना दाबून टाकण्याचा प्रयत्न करू नका. समाजात कोणतीही फूट पडणार नाही, याची काळजी घ्या. वंजारी समाजातील एकी कायम ठेवा, असे आवाहन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
वंजारी महासंघातर्फे नव्याने निवड झालेल्या समाजातील पोलीस उपनिरीक्षकांचा गौरव कार्यक्रम चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात बुधवारी झाला. त्या वेळी मुंडे बोलत होत्या. आमदार महेश लांडगे, पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गिते, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अच्युत हंगे, ज्येष्ठ वकील सुधाकर आव्हाड, सदाशिव खाडे, उमा खापरे आदी उपस्थित होते.
जातीपातीची शिकवण आम्हाला दिलेली नाही. परंतु, आपण ज्या समाजात जन्माला आलो, तो समाज वंचित राहू नये, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आज प्रत्येक समाजात भिंती वाढत चालल्या आहेत. राजकारणी त्यास खतपाणी घालून अधिक मजबूत करीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जिजाऊ, अहल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले यांना प्रत्येक समाजाने वाटून घेतले आहे. शिवाय या नेत्यांना सोशल मीडियातून बदनाम करून समाजात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा सर्व प्रकार तरुणांनी थांबवून आपली ऊर्जा सकारात्मक गोष्टीसाठी वापरली पाहिजे, असा सल्ला मुंडे यांनी दिला.
अन्यथा मी फोटो काढणार नाही
पंकजा मुंडे यांच्या हस्ते सत्काराच्या कार्यक्रमावेळी कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर गर्दी केली. त्यामुळे उडालेला गोंधळ थांबविण्यासाठी दस्तुरखुद्द ग्रामविकासमंत्री मुंडे यांनी हातात माईक घेतला. व्यासपीठावरील कार्यकर्त्यांनी खाली जावे अन्यथा मी फोटो काढू देणार नाही, असा सज्जड इशारा दिला. त्यानंतर कार्यकर्त्यांचा गोंधळ थांबला.
>पिंपरी-चिंचवड : गोपीनाथ मुंडेंचा गड
गोपीनाथ मुंडे यांचे पिंपरी-चिंचवडवर विशेष प्रेम होते. त्या वेळीपासून हा मुंडेंचा गड म्हणून ओळखला जात आहे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. द्रोणाचार्यांनी ज्याप्रमाणे अर्जुन व दुर्योधन या दोघांना प्रशिक्षण दिले. त्याचप्रमाणे आम्हालाही मुंडे यांनी शिकवण दिली. परंतु, अर्जुनाच्या भूमिकेतून मी समाजासाठी हे धर्मयुद्ध लढण्याचे ठरविले आहे, असे सांगून पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.