साहित्यातून मिळावा विचारांचा ठेवा

By Admin | Published: January 19, 2016 03:39 AM2016-01-19T03:39:58+5:302016-01-19T03:39:58+5:30

कला ही जीवनासाठीच असून, साहित्यिकांनी समाजातील दु:ख, वेदनांचे दर्शन घडवावे, असे आवाहन प्रसिद्ध लेखक, गीतकार जावेद अख्तर यांनी केले. तर रंजन, मनोरंजनाबरोबरच भविष्यातील नागरिक घडविण्यासाठीच्या

Keep your thoughts from the literature | साहित्यातून मिळावा विचारांचा ठेवा

साहित्यातून मिळावा विचारांचा ठेवा

googlenewsNext

सुधीर लंके/विश्वास मोरे,  पुणे
कला ही जीवनासाठीच असून, साहित्यिकांनी समाजातील दु:ख, वेदनांचे दर्शन घडवावे, असे आवाहन प्रसिद्ध लेखक, गीतकार जावेद अख्तर यांनी केले. तर रंजन, मनोरंजनाबरोबरच भविष्यातील नागरिक घडविण्यासाठीच्या विचारांचा ठेवा साहित्यातून मिळावा, असे आवाहन करीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनीही ‘जीवनासाठीच कला’ हा मंत्र सांगितला.
डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने आयोजित ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा वैभवशाली समारोप सोमवारी अख्तर आणि गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. राज्याचे शालेय शिक्षण आणि सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे, संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, मावळते अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, कार्यवाह प्रकाश पायगुडे, खजिनदार सुनील महाजन, पिंपरी- चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, आयुक्त राजीव जाधव, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, गौतम चाबुकस्वार, विनय कोरे, मेधा कुलकर्णी, माजी आमदार उल्हास पवार, प्रसिद्ध कलावंत दुर्गा जसराज, लता सबनीस, विद्यापीठाच्या प्रमुख भाग्यश्री पाटील, डॉ. सोमनाथ पाटील, यशराज पाटील, डॉ. स्मिता पाटील-जाधव, माजी आमदार उल्हास पवार, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. एन. राजदान, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदचे सहकार्यवाह भाऊसाहेब भोईर, मकरंद जावडेकर आदी उपस्थित होते.
जावेद अख्तर म्हणाले, ‘‘कलेसाठी कला की जीवनासाठी कला, हे द्वंद्व समाजात नेहमीच सुरू आहे. प्रगतिशील लेखकांनी साहित्यातून शोषितांचा आवाज बनण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, प्रचारकी ठरवून त्यांचा आवाज दाबण्याचे षड्यंत्र केले गेले. कवी आणि लेखकाचे कर्तव्य आहे की, त्यांनी समाजातील दु:ख, दैन्य, वेदना समोर आणले पाहिजे. शोषितांना आवाज दिला पाहिजे. मराठी साहित्याने बंडखोरी करून हे काम केले आहे. ते आणखी पुढे गेले पाहिजे.’’
अख्तर पुढे म्हणाले, ‘‘मागच्या पिढीने आपले आयुष्य स्वातंत्र्यासाठी दिले. मात्र, त्यानंतरच्या पिढीने आणि प्रामुख्याने मध्यमवर्गाने आपली जबाबदारी नाकारली. आजपर्यंतचा इतिहास आहे की, मध्यमवर्गानेच समाजाला विचार दिला आहे. परंतु, हे आज दिसत नाही. इंटेरिअर डेकोरेटरच्या सोयीने घरात पुस्तके ठेवली जातात. पडदे आणि खिडक्यांच्या कलरला मॅचिंग असणारी पुस्तके घेतली जातात. नव्या पिढीला साहित्याचा ठेवा दिला गेला नाही. प्रगतीची एक्स्प्रेस पकडण्याच्या नादात अनेक गोष्टी प्लॅटफॉर्मवरच विसरलो. त्यातीलच एक म्हणजे साहित्य, कला आहे. मराठीतील प्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे यांनी लिहून ठेवलय की, एखादे कौशल्य, ज्ञान असे प्राप्त करा की, त्यातून जगता येईल. मात्र, चांगल्या पद्धतीने जगायचे असेल, तर किमान एका कलेशी मैत्री केली पाहिजे.’’ भाषा हे खरे तर संवादाचे माध्यम. परंतु, भाषेमुळेच समाजात भिंती निर्माण झाल्या, अशी खंत व्यक्त करताना अख्तर म्हणाले, ‘‘आपल्याकडे अनुवादाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. दुसऱ्या भाषेतील एखादे पुस्तक आपण वाचले, तर त्यातून केवळ कथा समजत नाही, तर तो समाज, त्याची विचारधारा समजते. मग सगळेच लोक किती सारखे असतात, हे पाहून एकतेची भावना निर्माण होते. एकमेकांत स्नेह निर्माण होतो. यातून चांगल्या समाजाच्या निर्मितीची सुरुवात होते.’’मागच्या पिढीने केलेली चूक आता नवीन पिढी सुधारत आहे, याबद्दल समाधान व्यक्त करताना अख्तर म्हणाले, ‘‘भारतीय समाजाचे वैशिष्ट्य म्हणजे रस्ता चुकला, तरी तो कधी अधोगतीच्या खाईत पडत नाही. नवीन पिढी साहित्य, कला यांच्यात रुची घेत आहे.’’
सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करा : सबनीस
सबनीस यांनी आपल्या भाषणात बेळगाव सीमाप्रश्नाला हात घालत हा प्रदेश केंद्रशासित करण्याचा तोडगा सरकारसमोर मांडला. ते म्हणाले, ‘बेळगावच्या सीमाभागातील मराठी माणसांना जगणेच मुश्किल झाले आहे. मत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी त्यांनी मराठीत अर्ज केला तरी तो स्वीकारण्याची सहिष्णूता दाखवली जात नाही. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित पडला आहे. मात्र, केंद्रात व महाराष्ट्रात एकाच पक्षाचे सरकार असल्याने न्यायालयाच्या बाहेर सरकार संवादातून हा प्रश्न सोडवू शकते. दोन्ही सरकारांमध्ये समन्वय होऊन सीमाभाग हा केंद्रशासित प्रदेश जाहीर करावा. राज्यातील सर्व खासदारांनी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घालावे, तसेच तावडे यांनीही सरकारपर्यंत ही मागणी पोहोचवावी’.
गोव्यात कोकणीला राज्य भाषेचा दर्जा आहे. मात्र, तेथे मोठ्या प्रमाणावर मराठी बोलली जात असताना तसेच, मराठी शाळा व मराठी वृत्रपत्रे असतानाही तेथील सरकारने आश्वासन दिल्यानंतरही मराठीला राज्यभाषेचा दर्जा मिळालेला नाही. याबाबतही महाराष्ट्र सरकारने गोवा सरकारला साकडे घालावे, असे ते म्हणाले.
सांस्कृतिक सुडाचे चक्र तसेच, जाती-धर्मांतील सुडाग्नी थांबवून सेक्युलर प्रवाह सर्वांनी समजावून घ्यावा. ब्राम्हणवाद समाजाला घातक असून, तो एका विशिष्ट नव्हे तर सर्व जातीत आहे. हा ब्राम्हणवाद तसेच, इतिहास लेखनातील जात-धर्म व पक्षपात संपविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. आपणाला मिळालेल्या पाच
लाख निधीतून आपण प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक लेखकांना प्रादेशिक इतिहास लिहून त्यातून समकालीन इतिहास निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तावडे यांनी पाठ्यपुस्तकातील लैंगिक विषमतेकडे लक्ष वेधले. पाठ्यपुस्तकांत नकळत मुलगा-मुलगी यांच्यात भेद निर्माण करुन विषमता जोपासली जात आहे. खेळाचे मैदान म्हटले की मुलगा व स्वयंपाकघर म्हटले की मुलीचे उदाहरण दिले जाते. पाठ्यपुस्तकांतील हा लिंगभेद व विषमता संपविण्यासाठी आपण पाठ्यपुस्तकांचे आॅडीट सुरू केले असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Keep your thoughts from the literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.