आॅनलाइन वॉच ठेवणार
By admin | Published: January 25, 2016 03:05 AM2016-01-25T03:05:57+5:302016-01-25T03:05:57+5:30
‘इसिस’ला पायबंद करण्यासाठी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कंबर कसली आहे. इसिसच्या प्रभावाखाली तरुण येऊ नयेत म्हणून, प्रबोधनावर एटीएसचा भर राहणार आहे
पुणे : ‘इसिस’ला पायबंद करण्यासाठी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कंबर कसली आहे. इसिसच्या प्रभावाखाली तरुण येऊ नयेत म्हणून, प्रबोधनावर एटीएसचा भर राहणार आहे. त्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ सुरू केले जाणार असून सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर सक्रीय होणार असल्याचे संकेत एटीएसचे प्रमुख विवेक फणसळकर यांनी दिले आहेत.
इसिसकडून तरुणांना आकर्षित करण्यासाठी आॅनलाइन माध्यमांचा सर्वाधिक वापर केला जात आहे. सोशल मिडियावर विविध व्हिडिओ टाकून त्याद्वारे प्रचार-प्रसार सुरू आहे. आपण शक्तीमान असल्याचे सांगत सहभागी होण्याचे आवाहन इसिसकडून केले जात आहे, असे फणसळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, या पार्श्वभूमीवर लवकरच एटीएसचे स्वतंत्र संकेतस्थळ सुरू केले जाणार आहे. तसेच अन्य सोशल मीडियाचा वापर केला जाणार आहे. इसिसच्या प्रयत्नांना ‘आॅनलाइन’बरोबरच ‘आॅफलाइन’ अशा दोन्ही प्रकारे काऊंटर करावे लागेल.
सोशल मीडियावर काही अडचणी येत आहेत. त्यावर कशाप्रकारे मात करता येईल, याचा विचार सुरू आहे. दहशतवादी विचारांची माहिती मिळणार नाही किंवा अपलोड होणार नाही, यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले. मागील सात-आठ महिन्यांत इसिससारख्या दहशतवादी विचारांचा प्रसार करणारी ९४ संकेतस्थळे एटीएसने पोलीस व अन्य यंत्रणांच्या मदतीने ब्लॉक केली आहेत. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने रविवारीच प्रसिद्ध केले आहे. फणसळकर यांनीही अशी संकेतस्थळे ब्लॉक केल्याचे सांगून ‘लोकमत’च्या वृत्ताला पुष्टी दिली.