केजरीवालांचा जनलोकपाल अण्णांना अमान्य
By admin | Published: December 2, 2015 02:01 AM2015-12-02T02:01:54+5:302015-12-02T02:01:54+5:30
अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने विधानसभेत मांडलेले जनलोकपाल विधेयक ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना अमान्य आहे. केजरीवाल यांचा जनलोकपाल कमकुवत
पारनेर : अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने विधानसभेत मांडलेले जनलोकपाल विधेयक ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना अमान्य आहे. केजरीवाल यांचा जनलोकपाल कमकुवत असल्याचे सांगत अण्णांनी विधेयकात काही बदल सूचविले आहेत तसेच केंद्रात लोकपाल विधेयकाबाबत कोणत्याही हालचाली होत नसल्याने अण्णांनी नाराजीही व्यक्त केली आहे.
केजरीवाल सरकारने मांडलेल्या जनलोकपाल विधेयकावर वाद झाल्यानंतर मंगळवारी ‘आप’चे नेते कुमार विश्वास, संजय सिंह यांनी राळेगणसिद्धीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. अण्णा हजारे यांचे शिष्य, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मागील आठवड्यात जनलोकपाल विधेयक दिल्ली विधानसभेत मांडले. ते ‘महाजोकपाल’ असल्याचा आरोप अण्णांच्या टीमचे माजी सदस्य प्रशांत भूषण यांनी केला होता. त्यानंतर केजरीवाल यांनी अण्णा हजारे यांना विधेयकाची माहिती व्हावी म्हणून, मंगळवारी कुमार विश्वास, संजय सिंह यांना राळेगणसिद्धीत पाठविले होते. त्यांनी अण्णांना विधेयकाची माहिती दिली. (प्रतिनिधी)
राजकीय मतभेदातून आरोप
पत्रकारांशी बोलताना कुमार विश्वास म्हणाले, ज्यांनी लोकपालवर आरोप केले आहेत, त्यांना भाजपाचे मंत्री अरुण जेटली व इतर मंत्र्यांना वाचवायचे आहे. किरण बेदी, व्ही. के. सिंह, प्रशांत भूषण यांचा यात राजकीय स्वार्थ आहे. अण्णांनी सूचविलेले बदल आम्ही दिल्ली सरकारकडे देणार आहोत. मुख्यमंत्री केजरीवाल अण्णांच्या सूचना स्वीकारतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विधेयक मांडण्याआधी अण्णांच्या सूचना का घेतल्या नाहीत? या प्रश्नाला कुमार विश्वास यांनी बगल दिली. आम्ही पूर्वीसारखेच लोकपाल विधेयक मांडल्याचे सांगून अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला.
अण्णांच्या सूचना
लोकपालला पदावरून हटविण्यासाठी आधी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची चौकशी समिती नेमून त्यांनी दिलेल्या चौकशी अहवालानंतर विधानसभेत दोन तृतीयांश बहुमताने त्यांना पदावरून दूर करण्यात यावे. नियुक्त समितीत मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्याबरोबरच माजी लोकपाल व राजकारण विरहीत सामाजिक क्षेत्रातील एका व्यक्तीचा समावेश आवश्यक आहे, असे बदल अण्णांनी सूचविले आहेत.