केईएम, सायन, नायरमधील खाटा वाढणार
By admin | Published: October 23, 2015 02:26 AM2015-10-23T02:26:37+5:302015-10-23T02:26:37+5:30
मुंबईसह राज्यभरातील रुग्णांना दाखल करताना अडचणींना सामोरे जावे लागू नये म्हणून केईएम, सायन आणि नायर रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवण्यात येणार आहे.
मुंबई : मुंबईसह राज्यभरातील रुग्णांना दाखल करताना अडचणींना सामोरे जावे लागू नये म्हणून केईएम, सायन आणि नायर रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवण्यात येणार आहे. यासाठी महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी प्रशासकीय मान्यता बुधवारी दिली.
मुंबई शहरातील केईएम, सायन आणि नायर ही तीन प्रमुख रुग्णालये आहेत. त्यापैकी केईएम आणि सायन रुग्णालयात रुग्णसंख्येचे प्रमाण अधिक असते. त्याखालोखाल
नायर रुग्णालयाचा क्रमांक लागतो. येथे पुरेशा प्रमाणात खाटा
असूनही रुग्णांची संख्या वाढतच असल्याने ऐनवेळी रुग्णांना रुग्णालयात दाखल करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आता खाटा वाढल्यानंतर रुग्णांना काही प्रमाणात नक्कीच दिलासा मिळणार आहे. (प्रतिनिधी)
प्रमुख रुग्णालयांतील खाटा वाढणार
रुग्णालयातील खाटांच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी आता केईएमधील खाटांची संख्या १ हजार ७५० वरून २ हजार २०० करण्यात येणार आहे. सायन रुग्णालयातील खाटांची संख्या १ हजार ४५० वरून १ हजार ९०० करण्यात येणार आहे. नायर रुग्णालयातील खाटांची संख्या १ हजार ४०० वरून १ हजार ८५० एवढी करण्यात येईल.