तीस वर्षांपूर्वीची २०० रुपयांची उधारी फेडण्यासाठी केनियाचे खासदार औरंगाबादमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 01:13 PM2019-07-11T13:13:51+5:302019-07-11T13:15:06+5:30
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना दुकानदाराकडून घेतली होती उधारी
औरंगाबाद: तरुणपणाच्या काळात अनेकांना पैशांची चणचण जाणवते. अशाही परिस्थितीत काही होतकरु तरुण उधारउसनवारी करून शिक्षण पूर्ण करतात. तीस वर्षांपूर्वी असाच एक तरुण केनियातूनऔरंगाबादमध्ये आला. काही वर्ष राहून व्यवस्थापनाचं शिक्षण घेऊन मायदेशी परतला. मात्र तीस वर्षांपूर्वी एका स्थानिक दुकानदाराकडून घेतलेली २०० रुपयांची उधारी त्याच्या लक्षात होती. तरुणपणीच्या दिवसात केलेली ही उधारी त्यानं औरंगाबादला येऊन आठवणीनं चुकती केली. विशेष म्हणजे हा तरुण आता केनियामध्येखासदार झाला आहे.
१९८५-८९ दरम्यान रिचर्ड टोंगी औरंगाबादमध्ये शिक्षण घेत होते. त्यावेळी स्थानिक दुकानदार काशीनाथ गवळी रिचर्ड यांना मदत करायचे. शिक्षण पूर्ण करुन टोंगी मायदेशी परतले, तेव्हा त्यांना काशीनाथ यांना २०० रुपये द्यायचे होते. काशीनाथ यांनी अडचणीच्या काळात केलेली मोलाची मदत टोंगी यांच्या कायम लक्षात होती. अखेर एका शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आलेल्या टोंगी यांना उधारीची परतफेड करण्याची संधी मिळाली. त्यांनी तीस वर्षांपूर्वी घेतलेली उधारी काशीनाथ यांना परत केली. टोंगी यांना पाहून काशीनाथ गवळी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे डोळे भरुन आले.
टोंगी रिचर्ड यांनी मौलाना आझाद महाविद्यालयातून शिक्षण घेतलं. खासदार असलेले टोंगी सध्या संरक्षण समितीचे उपप्रमुख आहेत. भारत भेटीवर आलेल्या टोंगी यांनी न विसरता औरंगाबादमधील वानखेडे नगरला भेट दिली. काशिनाथ काकांना भेटून त्यांनी तीस वर्षांपूर्वीची उधारी फेडली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना टोंगी आवश्यक सामान काशीनाथ यांच्या दुकानातून खरेदी करायचे. काशीनाथ यांनीच टोंगी यांना राहण्यासाठी घर मिळवून दिलं. याच उपकारांची जाणीव ठेवून टोंगी यांनी काशीनाथ यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.