केरळचे नायर कोल्हापुरात करतायत वृक्षसंवर्धन..

By Admin | Published: November 2, 2016 08:51 AM2016-11-02T08:51:01+5:302016-11-02T08:51:01+5:30

पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, या जाणिवेतून, घरासमोरील व सोसायटीसह अन्य परिसर सुशोभित दिसावा, यासाठी कोल्हापूरमधील शाम नायर ९ वर्षांपासून स्वखर्चातून २०० पेक्षा अधिक रोपं लावली आहेत

Kerala Nair tree planting trees in Kolhapur .. | केरळचे नायर कोल्हापुरात करतायत वृक्षसंवर्धन..

केरळचे नायर कोल्हापुरात करतायत वृक्षसंवर्धन..

googlenewsNext

स्वखर्चातून जपताहेत आवड : प्राणिमित्र, समाजसेवेचीही जोड; २०० पेक्षा अधिक रोपांची लागवड


शेखर धोंगडे, ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. २ -  आपण निसर्गाचे काहीतरी देणं लागतो, निसर्गावरच सर्वांचे जीवन अवलंबून आहे, त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, या जाणिवेतून नावासाठी नव्हे, तर स्वत:च्या घरासमोरील व सोसायटीसह अन्य परिसर सुशोभित दिसावा, यासाठी येथील शाम नायर यांनी नऊ वर्षांपासून स्वखर्चातून २०० पेक्षा अधिक छोटी-मोठी रोपं लावली आहेत.
संजय गणेश नायर ऊर्फ शाम नायर यांचे मूळ गाव केरळ. (त्रिवेंद्रम). वडील गणेश भास्करन नायर हे टायर पंक्चरच्या व्यवसायानिमित्त कोल्हापूर येथे आले अन् स्थायिक झाले. वडिलांचा व्यवसाय सांभाळत कोल्हापूर येथेच शिक्षण पूर्ण करीत आपल्या वृक्षसंवर्धनातून त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. कोल्हापूरच्या मातीतच एकरूप होत, केरळी परंपरेबरोबरच कोल्हापुरचीही संस्कृती, माणुसकी जपत प्रभाग क्रमांक-२३ मध्ये असलेल्या स्वत:च्या छोट्याशा घरापासून त्यांनी एके क रोपं लावण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्रिमूर्ती हौसिंग सोसायटी, सलग सोसायटी, स्टार बझार ते विक्रम स्टाईल्ससह जेथे मोकळी जागा मिळेल तेथे श्याम यांनी विविध प्रकारच्या फुलांची छोटी-छोटी रोपं लावली व ती जगविली सुद्धा. या वृक्षप्रेमी स्वभावामुळेच आज ते सर्वत्र परिचित आहेत. यामुळेच या वृक्षप्रेमी नायर यांना सोसायटीमधीलच लहान-थोर मंडळीही पुढाकार घेत दर रविवारी वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम हा उपक्रम राबवित असतात. नायर यांची स्वच्छतेची व समाजसेवेची आवड पाहून येथील डॉ. हर्षवर्धन जगताप हे वृक्षारोपणासाठी, तसेच सजीव नर्सरी दरवेळेस पाच रोपं देतात.
सोसायटीचे अध्यक्ष सर्जेराव पाटील, प्रवीण आवळे, सचिन सरदार यांच्यासह योगेश कडगावकर, नितीन साठे, राहुल साठे, नागराज नायर, विपुल काळे, योगेश क्षीरसागर, रोहन जोशी, रोहित-रोहण हळदणकर, रोहित पाटील ही त्रिमूर्ती स्पोर्टस्मधील तरुणाईही त्यांच्या कार्याला हातभार लावत असते. यातूनच ‘एकला चलो रे’ म्हणणाऱ्या नायर यांच्या जोडीला अनेकांची साथ मिळाल्याने ‘एकमेका साह्य करू, अवघा परिसर सारा फुलवू’ अशी त्यांची मोहीम आता वेग धरू लागली आहे.
कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ स्वच्छतेचा ध्यास म्हणूनच हे कार्य सुरू ठेवण्याचा सर्वांचा मानस आहे. यातूनच पुढे शाम नायर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध जयंती, उत्सव, शैक्षणिक उपक्रम, शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धांही घेतल्या जात आहेत. यामध्येही नायर यांचे सर्वस्तरांवरचे योगदान अधिकच असते.


- केवळ वृक्षप्रेमीच नव्हे, तर प्राणिमित्र व सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही त्यांची दुसरी ओळख सांगता येईल. अपंग व्यक्तींना मदत, मनोरुग्णांवर उपचार, त्यांच्या स्वच्छतेची निगा राखणे, त्यांना तात्पुरता निवारा देणे, घरी नेऊन सोडण्याचेही ते काम करतात.
-

साप पकडण्याची माहिती असल्याने रात्री-अपरात्री केव्हाही साप पकडण्यासाठीही ते जातात. जखमी पक्षी, प्राणी आढळल्यास त्यावर उपचार करून त्यांना पांजरपोळ येथे नेऊन सोडतात.


प्रभागासाठीही थोडेसे

- प्रभागामध्ये रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी आंदोलन, बागेचे सुशोभिकरण, कचऱ्याचे कोंडावळे यासाठीही पुढाकार घेऊन नगरसेवकांकडे पाठपुरावा करून अनेक कामे करून घेतली आहेत. येथील नगरसेवक उमा इंगळे, नाना कदम, माजी नगरसेवक गौतम जाधव यांनीही त्यांच्या समाजसेवेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. खासदार धनंजय महाडिक यांनीही शाम नायर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचे कौतुक केले आहे. यातूनच येथील एक बाग सुशोभिरणासाठी त्यांना दिली आहे. नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे, वृक्षारोपणासाठी मदत करणे, काहींना स्वत:कडील वृक्षरोप भेट म्हणून देण्याचे महत्त्वाचे कार्य करतात.

सुरुवात एकट्याने झाली असली तरी, चांगल्या कार्याला अनेकांची साथ मिळते. माझ्या परिसरातील तरुण मुले, ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर, नोकरदार वर्ग, महिला हे वेळ काढूून सहकार्य करत आहेत. यातूनच मराठा मोर्चासाठीही अन्नछत्र, पाणीवाटप करण्यासाठी ते एकत्र आले. वाचन व बाबा आमटे यांच्या कार्यातून मला ही प्रेरणा मिळाली. केरळ व कोल्हापूरचे सौंदर्यही पाहण्यासारखे आहे. ते टिकले पाहिजे. सर्वांनी निसर्गावर प्रेम केले, तरच हे शक्य आहे.
- शाम नायर, वृक्षप्रेमी, प्राणिमित्र-सामाजिक कार्यकर्ते, कोल्हापूर.

Web Title: Kerala Nair tree planting trees in Kolhapur ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.