‘आधार’ने घटला केरोसिनचा कोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2017 03:25 AM2017-01-25T03:25:49+5:302017-01-25T03:25:49+5:30
राज्य सरकारने शिधापत्रिकाधारकांशी आधार कार्ड जोडण्याची मोहीम हाती घेतल्यानंतर, एकट्या पुणे विभागातून गेल्या वर्षभरात
पुणे : राज्य सरकारने शिधापत्रिकाधारकांशी आधार कार्ड जोडण्याची मोहीम हाती घेतल्यानंतर, एकट्या पुणे विभागातून गेल्या वर्षभरात तब्बल दोन हजार ३०३ किलो लीटर्सचा केरोसिन कोटा कमी झाला असून, धान्याची मागणीदेखील सहा हजार ७०७ टनांनी घटली आहे.
अनेकदा दोन शिधापत्रिकेवर एकाच व्यक्तीची नावे असणे, मृत्यूनंतरही शिधापत्रिकेवरून नावे कमी न करणे, लग्नानंतर मूळ शिधापत्रिकेतील नाव कमी न करता, दुसऱ्या ठिकाणी नवीन शिधापत्रिका काढण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे एकाच व्यक्तीच्या नावे वेगवेगळ््या ठिकाणी धान्य कोटा जमा होण्याचा धोका असतो. या शिवाय काही शिधापत्रिकाधारक धान्य घेतदेखील नाहीत. मग अशा व्यक्तींचा कोटा काळ््या बाजारात जिरविला जात असल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकारी योजना आधार कार्डशी जोडण्यात येत आहे.
पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा व सांगली या पुणे विभागात एप्रिल २०१६ रोजी ७ हजार ७५४ किलोलीटर्स केरोसिनचा कोटा होता. त्यात ५ हजार ४५१ किलोलीटर्सपर्यंत घट झाली आहे. पुणे जिल्ह्यातील केरोसिनच्या कोट्यात एप्रिल ते डिसेंबर २०१६ दरम्यान २५२, तर शहरातील कोट्यात ९२५ किलोलीटर्सने घट झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ३९६ किलोलीटर्सने केरोसिनचा कोटा घटला आहे. (प्रतिनिधी)