केसरकरांचा आरोप : पंधरा वर्षांची पापे पंधरा दिवसांत कशी धुऊन काढू?
By Admin | Published: January 9, 2015 11:41 PM2015-01-09T23:41:36+5:302015-01-10T00:28:20+5:30
राणे यांच्या कामांची चौकशी करणार
सावंतवाडी : रेडीला उच्च दर्जाचे बंदर असताना आरोंदा बंदराला परवानगी देणे चुकीचेच आहे. आरोंदा बंदर हे काँग्रेस नेते नारायण राणे यांनी जन्माला घातलेले अपत्य आहे, असा आरोप सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी केला. पंधरा वर्षांत राणे यांनी केलेल्या कामांची चौकशी करणार, अशी घोषणाही त्यांनी केली. केसरकर यांनी यावेळी राणे यांनी केलेली पापे पंधरा दिवसांत कशी धुऊन काढू, असा सवालही केला.
आरोंदा येथे झालेल्या दगडफेक व लाठीमाराच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत पत्रकारांशी संवाद साधला. केसरकर म्हणाले, मी या जिल्ह्याचा पालक आहे. त्यामुळे मी माझ्याच लोकांवर लाठीमार करण्याचे आदेश कसे देईन? हे आदेश पोलिसांच्या वरिष्ठस्तरावर होत असतात. त्यात लोकप्रतिनिधींची कोणतीही भूमिका असत नाही. मी फक्त कायदा सुव्यवस्था बिघडू नये, याची काळजी घेऊ शकतो. लाठीमार करा, एफआयआरमधील कलमे बदला, असे सांगू शकत नाही, असा खुलासाही केला.चार दिवसांपूर्वी आरोंदा येथे काँग्रेसचे पदाधिकारी गेले होते. जर त्यांनीच या जेटीला परवानगी दिली, तर ते कशासाठी गेले? लोकांना भडकावण्यापेक्षा यातून मार्ग काढून देणे गरजेचे आहे, असे मतही केसरकर यांनी यावेळी मांडले. आतापर्यंत त्यांना आरोंदावासीयांचा पुळका का आला नाही? माझ्या मतदारसंघातील हा प्रश्न असून आरोंदावासीय माझे आहेत. त्यांनी मला मते दिली आहेत. त्यामुळे त्यांची अडचण ती माझी अडचण असून, त्यांना न्याय हा दिलाच जाईल.
प्रदूषणकारी प्रकल्प पर्यटनस्थळी नकोच
आरोंदा हे पर्यटन स्थळ असून तेथे प्रदूषणकारी प्रकल्प येऊ नये, असे मला वाटते, आरोंदा पर्यटनस्थळ म्हणून उदयाला येत आहे. पण तेथे अशा प्रदूषणकारी प्रकल्पाला त्या काळात परवानगी कशी काय देण्यात आली, असा सवाल केसरकर यांनी केला.
आरोंदा व तेरेखोल खाडीपात्राच्या मुखाशी असलेली भिंत जर फोडली गेली, तर त्याचा फटका बांदा व आरोंदा गावांना बसणार आहे. तेरेखोल खाडीपात्राचा उगम आंबोलीतून होतो. निसर्गाला आणखी किती हानी पोहोचवणार, असाही सवाल केसरकर यांनी उपस्थित
(प्रतिनिधी)
राणे यांच्या कामांची चौकशी करणार
काँग्रेस नेते नारायण राणे यांनी गेल्या पंधरा वर्षांत चुकीच्या कामांना दिलेल्या परवानग्या मी मुख्यमंत्री स्तरावर नेणार असून, या सर्व प्रकरणांच्या चौकशीची मागणी करणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आरोंदा बंदर हा विषय न्यायालयीन प्रक्रियेत आहे. त्यावर मी भाष्य करणे योग्य ठरणार नाही. पण याबाबत माझे मत जिल्हाधिकारी स्तरावर झालेल्या बैठकीत दिले आहे.
- दीपक केसरकर, पालकमंत्री
बंदराऐवजी ‘मरीन’चा व्यवसाय करा
राजन तेली हे माझ्या विरोधात उभे राहिले असले, तरी मी त्यांचा द्वेष करणार नाही, पण त्यांनी आरोंदावासीयांचा विरोध ओळखून बंदराऐवजी मरीन व्यवसाय करावा. त्यासाठी त्यांना मीही मदत करेन. रेडी बंदरातून निर्यातीसाठीही परवानगी मिळवून देऊ, असेही मंत्री केसरकर म्हणाले.