Corona Vaccination: राज्याला किती लस मिळाल्या? भाजपने थेट आकडेवारीच दिली; पाहा, डिटेल्स
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 08:02 PM2021-04-12T20:02:44+5:302021-04-12T20:05:29+5:30
Corona Vaccination: केंद्राकडून महाराष्ट्राला किती लसी मिळाल्या, याची आकडेवारीच भाजपने दिली आहे.
मुंबई: कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि कोरोना लसींचा तुटवडा (corona vaccination) यांवरून गेल्या काही दिवसांपासून केंद्र आणि राज्य यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरण होत असूनही मागणीप्रमाणे पुरवठा केला जात नसल्याचा आरोप सातत्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे करत असताना मात्र राज्याला जास्त लसी दिल्याचा दावा भाजपकडून केला जात होता. आता थेट सोमवार, १२ एप्रिल रोजी केंद्राकडून महाराष्ट्राला किती लसी मिळाल्या, याची आकडेवारीच दिली आहे. (keshav upadhye gave details related to corona vaccination in the state)
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक ट्विट करून राज्याला किती कोरोना लसींचा साठा मिळाल, राज्यात किती जणांना लस देण्यात आली आणि राज्यात कोरोना लसींचा किती साठा शिल्लक आहे, याची थेट आकडेवारीच या ट्विटमध्ये दिली आहे. यावरून राज्यातील कोरोना लसीकरणावरून केले जात असलेले दावे, चर्चा आणि आरोप यांना पूर्णविराम दिल्याचे सांगितले जात आहे.
१२ एप्रिल साय ५ वाजेपर्यत
— Keshav Upadhye (@keshavupadhye) April 12, 2021
महाराष्ट्राला मिळालेला लसीकरणाचा साठा= 1,22,40360
राज्याने लसीकरण केले ती संख्या = 1,05,81,770
राज्यात शिल्लक लसीचा साठा = 🔳16,58,590🔳
जाणून घेऊया आकडेवारी
केशव उपाध्ये यांनी ट्विट करत दिलेल्या आकडेवारीनुसार, १२ एप्रिल सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाराष्ट्राला १ कोटी २२ लाख ४० हजार ३६० कोरोना लसींचा साठा मिळाला. राज्यात आतापर्यंत लसीकरण झालेल्यांची संख्या १ कोटी ०५ लाख ८१ हजार ७७० इतकी असून, राज्यात शिल्लक कोरोना लसींचा साठा १६ लाख ५८ हजार ५९० इतका असल्याची माहिती उपाध्ये यांनी दिली आहे.
टाळी-थाळी, उत्सव खूप झालं, आता देशाला आधी लस द्या; राहुल गांधी कडाडले
राहुल गांधीची केंद्रावर टीका
गेल्या ३८५ दिवसांत कोरोनाविरुद्धची लढाई जिंकता आलेली नाही. उत्सव, टाळी-थाळी खूप झाले, आता देशाला लस द्या, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली असून, आता दुसरी लाट आहे आणि लाखो जण कोरोनाचे बळी ठरले आहेत. तुम्ही इव्हेंटबाजी कमी करा, ज्या कुणाला लसीची आवश्यकता आहे त्याला ती मिळवून द्या. लसीची निर्यात बंद करा, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
“राज्यातील सर्व मंत्री आणि शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागेल”
दरम्यान, कोरोनाचा फैलाव युद्धपातळीवर रोखण्यासाठी पुढील दोन-तीन आठवडे ठामपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले होते. अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी ‘लस महोत्सव’ आयोजित करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी यावेळी केले होते.