खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचा तिढा सोमवारी सुटण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 01:06 AM2017-07-30T01:06:24+5:302017-07-30T01:06:35+5:30
‘नीट’ परीक्षेद्वारे देशभरात वैद्यकीय प्रवेश सुरू झाले असले तरीही महाराष्ट्रात गोंधळ सुरूच आहे. वैद्यकीय प्रवेशाची पहिली यादी जाहीर करताना विनाअनुदानित
मुंबई : ‘नीट’ परीक्षेद्वारे देशभरात वैद्यकीय प्रवेश सुरू झाले असले तरीही महाराष्ट्रात गोंधळ सुरूच आहे. वैद्यकीय प्रवेशाची पहिली यादी जाहीर करताना विनाअनुदानित खासगी महाविद्यालये प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडली. दोन दिवस सरकार खासगी वैद्यकीय महाविद्यालयांशी चर्चा करत असूनही त्यांना यश आलेले नाही. यासंदर्भात सोमवारी निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मुंबईसह राज्यातील सरकारी व खासगी मेडिकल महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय प्रवेश प्रक्रिया राबविते. राज्यातील शासकीय आणि पालिका वैद्यकीय महाविद्यालयांची यादी गुरूवारी रात्री जाहीर झाली. मात्र खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना शुल्क नियंत्रण समितीने दिलेल्या शुल्कावर प्रवेश देणे शक्य नसल्याचे महाविद्यालयांचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारले आहेत. याप्रश्नी लवकरात लवकर मध्यस्थी करण्याचा संकेत देताना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी विद्यार्थ्यांना चिंता न करण्याचे आवाहन केले होते. यासंदर्भात खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची विशेष बैठक झाल्याचे कळते. पण या बैठकीत एकमत होऊ न शकल्याने याबाबत अद्याप निर्णय झाला नसून तो सोमवाारी होण्याची शक्यता आहे.