खडसेंना मुख्यमंत्रीच काय, पंतप्रधानही व्हावेसे वाटेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 04:58 AM2018-08-06T04:58:26+5:302018-08-06T04:58:43+5:30
एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्रीच काय, तर पंतप्रधानही व्हावेसे वाटेल.
नाशिक : एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्रीच काय, तर पंतप्रधानही व्हावेसे वाटेल. भारतीय जनता पार्टीमध्ये कोणत्याही पदावर नियुक्तींचा निर्णय पक्षश्रेष्ठींकडूनच घेतला जातो. पक्षात अनेक ज्येष्ठ नेते असतानाही नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्याचे सांगत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना टोला लगावला.
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभा निवडणुकीत मी शिवसेनेसोबत युती करण्यात विरोध केला होता. त्यामुळे भाजपाला यश मिळाले. सत्ता मिळाल्यानंतर ज्येष्ठतेनुसार मीच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार होतो, असे विधान शनिवारी केले होते. त्यावर राजकारणात सर्वांनाच आपण मुख्यमंत्री तथा पंतप्रधान व्हावेसे वाटते. भाजपात कोणत्याही पदनियुक्तीचा निर्णय पक्षश्रेष्ठींचाच असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्रिमंडळ व मंत्रिमंडळाबाहेर अनेक ज्येष्ठ नेते असतानाही नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्याचे सांगतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
> संभाव्य दुष्काळी स्थितीवर उद्या बैठक
पावसाने दडी मारल्यामुळे पाण्याची परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे. उत्तर महाराष्ट्रासह, मराठवाडा व विदर्भात अनेक भागांत पावसाअभावी पिके धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात दुबार पेरणीचे संकट आहे. मंगळवारी मुंबईत उच्चस्तरीय बैठक घेऊन उपाययोजनेविषयी चर्चा करण्यात येणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.