‘खादी’ची व्यसनं ‘झाकल्या मुठीत’

By Admin | Published: February 24, 2015 10:49 PM2015-02-24T22:49:23+5:302015-02-25T00:12:10+5:30

शौकीन नेत्यांची आकडेवारी धक्कादायक : नजरेत येऊ नये म्हणून लढविल्या जातात वेगवेगळ्या क्लृप्त्या---लोकमत सर्वेक्षण

'Khadi' addiction 'covered' | ‘खादी’ची व्यसनं ‘झाकल्या मुठीत’

‘खादी’ची व्यसनं ‘झाकल्या मुठीत’

googlenewsNext

सातारा/कऱ्हाड: ‘कोणतही व्यसन सहज सुटत नाही,’ असं म्हणतात. कितीही हात झटकले तरी ते पिच्छा पुरवतंच. गरीब, श्रीमंत हा भेद व्यसनांमध्ये नसतो. जी व्यसन सामान्य माणसं उघड-उघड करतात, तीच श्रीमंत अथवा लोकप्रतिनिधी लपून-छपून करतात. फरक असेल तर तो फक्त ‘ब्रँड’चा, बाकी सगळं काही ‘सेम’च असतं. सामान्यांचा ‘ब्रँड’ साधा आणि परवडणारा, तर लोकप्रतिनिधींचा महागडा आणि लपवता येण्यासारखा. आपलं व्यसन कोणाच्या दृष्टीस येऊ नये, हाच महागडा ‘ब्रँड’ वापरण्यामागे लोकप्रतिनिधींचा मुख्य उद्देश असतो, हे ‘लोकमत’ सर्वेक्षणात स्पष्ट झाले. महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्याच्या अकस्मात निधनानंतर त्यांना आदरांजली वाहताना ‘मी जे सांगितलं ते त्यांनी त्याचवेळी ऐकलं असतं तर आज ही वेळ आलीच नसती,’ असं सूचक वक्तव्य एका माजी मंत्र्यांनी केले. या नेत्याच्या मृत्यूनंतर तंबाखूमुक्त महाराष्ट्रासाठी शासनाच्याही हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने सर्व्हे केला असता काही धक्कादायक बाबी उघड झाल्या. ग्रामपंचायत सदस्यापासून ते मंत्रिपदापर्यंतचे काही लोकप्रतिनिधी तंबाखू, सिगारेट, मावा किंवा गुटखा खात असल्याचे उघड झाले. त्यातल्या त्यात तंबाखूच्या आहारी गेलेल्या लोकप्रतिनिधींचे प्रमाण अधिक आहे. तंबाखूपाठोपाठ सिगारेट आणि त्यानंतर मावा, गुटखा खाणाऱ्या लोकप्रतिनिधींची संख्या आहे. सामान्यांमधील व्यसनाधीनता कमी व्हावी, यासाठी यापूर्वीच शासनाने गुटखाबंदी केली आहे. त्यापाठोपाठ ‘मावा’ही हद्दपार करण्याचा प्रयत्न झाला. सार्वजनिक ठिकाणी होणारे धुम्रपान रोखण्यासाठी ‘धूम्रपान बंदी कायदा’ही अस्तित्वात आला; पण एवढे करूनही व्यसनं कमी झाली का, हा संशोधनाचा विषय आहे. सर्वसामान्यांचं सोडाच; पण लोकप्रतिनिधी तरी व्यसनांपासून दूर राहिलेत का, हासुद्धा प्रश्नच आहे. तंबाखू, मावा, गुटखा आणि सिगारेट ही व्यसन अनेकांमध्ये पाहायला मिळतात. सामान्यांप्रमाणेच काही लोकप्रतिनिधीही या व्यसनांच्या आहारी गेलेत. अगदी ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून मंत्रिपदापर्यंतचे अनेक लोकप्रतिनिधी व्यसन करतात. कधी-कधी ते उघड होतं; पण बहुतांशवेळा ते ‘झाकल्या मुठी’तच राहतं. काही लोकप्रतिनिधी सिगारेट ओढतात; पण ते करण्यासाठी त्यांना बंदिस्त खोली, किंवा अन्य एखाद्या सुरक्षित ठिकाणाचा आधार घ्यावा लागतो. तंबाखू खाणारे लोकप्रतिनिधींही विशेष काळजी घेतात. पुडीतून काढताच सरळ दाढेपर्यंत पोहोचेल, अशी विशिष्ट तंबाखू त्यांच्याकडून वापरली जाते. मावा खाणारेही आहेत; पण त्यांची संख्या कमी आहे. (लोकमत टीम) ... असा तयार होतो मावा मावा तयार करण्यासाठी १२०/३०० तंबाखू, किमाम, चुना आणि सुपारी वापरली जाते. प्लास्टिकच्या कागदात बारीक सुपारी घेऊन त्यामध्ये तंबाखूसह चुना आणि किमाम मिसळला जातो. या मिश्रणामध्ये प्रमाणानुसार साधे पाणी घातले जाते. सर्व मिश्रण एकजीव होण्यासाठी प्लास्टिकच्या कागदात गुंडाळून ते काही काळ तळहातावर घासले जाते. तयार झालेला मावा प्लास्टिकच्या लहान पिशव्यांमध्ये किंवा कागदांमध्ये भरून त्याची विक्री केली जाते. मसाले पानाचा मसाला वापरून तयार करण्यात आलेल्या माव्याला ‘गोड मावा’ म्हटले जाते. तंबाखूची पुडी किंवा सिगारेटचे पाकीट सोबत न बाळगता अनेक लोकप्रतिनिधी जवळच्या कार्यकर्त्याकडे ते ठेवायला देतात. तल्लफ होईल त्यावेळी इतरांची नजर चुकवून कार्यकर्त्यांकडून ते मागून घेतले जाते. ‘डबी’ टाळून ‘रेडीमेड’वर भर तंबाखूची सवय असणाऱ्या लोकप्रतिनिधींची नेहमी ‘पंचाईत’ होते. चारचौघात त्यांना तळहातावर तंबाखू मळता येत नाही. तसेच खिशात तंबाखूची पुडी आणि चुन्याची डबी ठेवणेही शक्य नसते. त्यामुळे असे लोकप्रतिनिधी रेडिमेड तंबाखूवर भर देतात. पुडीतून काढून लगेच ती खाता येत असल्याने अशा तंबाखूला लोकप्रतिनिधींची पसंती असते. महागडी सुगंधित सिगारेट सिगारेट ओढणारे लोकप्रतिनिधी धूम्रपानानंतर त्याचा उग्र वास येऊ नये, यासाठी विशेष काळजी घेतात. साधी सिगारेट ओढल्यानंतर हमखास वास येतो. त्यामुळे काही लोकप्रतिनिधी सुगंधित सिगारेट वापरतात. अशा दहा सिगारेटचे पॅकेट शंभरपासून दीडशे रूपयांपर्यंत मिळते.

Web Title: 'Khadi' addiction 'covered'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.