खादीवरील ‘जीएसटी’ आजपासून रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 04:35 AM2017-10-02T04:35:45+5:302017-10-02T04:35:49+5:30
खादीवर ५ ते १२ टक्के ‘वस्तू आणि सेवाकर’ (जीएसटी) आकारण्यात येत होता. त्याचा फटका खादी उद्योगाला बसत असल्याने केंद्र सरकारने गांधी जयंतीचे औचित्य साधत खादी कापडावरील जीएसटी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
राम शिनगारे
औरंगाबाद : खादीवर ५ ते १२ टक्के ‘वस्तू आणि सेवाकर’ (जीएसटी) आकारण्यात येत होता. त्याचा फटका खादी उद्योगाला बसत असल्याने केंद्र सरकारने गांधी जयंतीचे औचित्य साधत खादी कापडावरील जीएसटी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वातंत्र्याच्या संघर्षात खादी कापड सर्वांच्या प्रेरणेचे, अस्मितेचे प्रतीक बनले होते. महात्मा गांधी यांनी खादीला प्रोत्साहन दिले. याच खादी कपड्यांवर १ जुलैपासून देशभर लागू झालेला जीएसटी कर आकारण्याचा निर्णय झाला. यामुळे खादी कपड्यांच्या विक्रीत तब्बल २० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली. याची दखल घेत खादी मंडळाने जीएसटी परिषदेसमोर सादरीकरण केले. हा कर कायम ठेवला तर खादी उद्योग बंद पडू शकतो, असेही सांगितले.
काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात खादीवर कर आकारण्यात येत नव्हता, असेही जीएसटी परिषदेच्या लक्षात आणून दिल्याचे मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे अध्यक्ष ना. वि. देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यानंतर जीएसटी परिषदेने खादीच्या कापडावरील कर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी गांधी जयंतीपासून (२ आॅक्टोबर) करण्यात येणार असल्याचेही देशपांडे यांनी सांगितले.
केंद्र सरकारने खादीची धोती, लुंगी, साडी आणि वूलन, सिल्क प्रकारच्या कापडावरील जीएसटी कर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
खादीच्या कापडावर जीएसटी रद्द करण्यात आला असला तरी तयार कपड्यांवर १ हजार रुपयांपर्यंत ५ टक्के आणि एक हजार रुपयांपेक्षा अधिक खरेदी केल्यास १२ टक्के जीएसटी कायम असणार आहे.