फडणवीसांना खुर्ची प्यारी!

By admin | Published: February 9, 2017 05:53 AM2017-02-09T05:53:08+5:302017-02-09T05:53:08+5:30

मुंबईत शिवसेना असली पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही वाटत होते, पण तो बिचारा माणूस आहे. मोदी-शहांच्या मर्जीवर चालतो

Khadki Khatki loved! | फडणवीसांना खुर्ची प्यारी!

फडणवीसांना खुर्ची प्यारी!

Next

यदु जोशी,  मुंबई
मुंबईत शिवसेना असली पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही वाटत होते, पण तो बिचारा माणूस आहे. मोदी-शहांच्या मर्जीवर चालतो. आपली मुख्यमंत्रिपदाची खुर्ची वाचविण्यासाठी त्यांनी शिवसेनेला अंगावर घेतले आहे, मुंबईच्या हिताचे त्यांना पडलेले नाही, असा घणाघात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
राज्यात काँग्रेसची सत्ता असली तरी मुंबईत शिवसेनाच हवी, असे आधीच्या काही काँग्रेसी मुख्यमंत्र्यांनादेखील वाटायचे. फडणवीस यांच्याबद्दल आपला अनुभव काय, या प्रश्नात उद्धव म्हणाले की, त्यांनाही तेच वाटते हो, पण ते तरी काय करणार? ते मोदी-शहांच्या हुकमाचे ताबेदार आहेत. त्यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झालेले आहेत. तेव्हा खुर्ची वाचवायची तर वरच्यांच्या मर्जीने वागल्याशिवाय त्यांना पर्याय नाही. त्यांचा नाइलाज आहे. खुर्चीपेक्षा मुंबई प्यारी असती तर त्यांनी युती केली असती. (गोव्याचे मुख्यमंत्री पार्सेकर हे पंतप्रधान मोदींसमोर दीनवाणे हावभाव करीत असल्याचा व्हिडीओही उद्धव यांनी या वेळी दाखविला.)
प्रश्न : आपली आणि मुख्यमंत्र्यांची प्रतिमा ही संयमी नेत्यांची असूनही गेले काही दिवस आपण एकमेकांवर करीत असलेल्या टीकेची पातळी घसरली आहे असे आपल्याला नाही वाटत?
ठाकरे : सुरुवात फडणवीसांनी केली, मग मीही बोललो. तुम्ही म्हणता तसे आम्ही संयमी असू पण, मी त्यांच्यासारखे गुंड घेऊन फिरत नाही. गुंडांच्या प्रवेशाचे सोहोळे आम्ही करीत नाही. मी खोटे बोलत नाही ते खोटे बोलतात. मुंबई महापालिकेच्या पारदर्शक कारभाराची पावती त्यांचे केंद्रातील सरकार देते आणि ते खोटे बोलून आमच्यावर आरोप करतात. कल्याण-डोंबिवलीला साडेसहा हजार कोटी रुपये देऊ म्हणाले होते पण छदामही दिला नाही.
प्रश्न : नागपूर, विदर्भात आपली एकही प्रचारसभा नाही. असे का?
ठाकरे : तुम्हीच (मीडियावाले) म्हणता की माझा आणि फडणवीसांशी खास स्रेह आहे मग आता मी नागपुरात गेलो तर मला सगळे बोलावे लागेल. नागपूर महापालिकेत घोटाळे झाले तेव्हा कोण महापौर होते, किती नगरसेवक जेलमध्ये गेले होते? घोटाळे कोणाच्या काळात झाले ते सगळेच सांगावे लागेल. नागपुरातील घोटाळ्यांची पुस्तिका आम्ही काढलीच आहे. आम्ही त्यावर बोललो तर अस्वस्थ झाले. ‘आम्हाला विनाकारण माफिया म्हणून हिणवतात आणि त्यांचे काय, ‘सब माफकिया का?
प्रश्न : फडणवीस यांची प्रतिमा तर स्वच्छ आहे म्हणतात, आपल्याला काय वाटते?
ठाकरे : आपल्या पक्षातील मंत्र्यांच्या घोटाळ्यांवर त्यांनी पांघरुण टाकले. कोणतीही चौकशी न करता त्यांना क्लीनचिट दिली हादेखील एकप्रकारचा भ्रष्टाचारच आहे.
प्रश्न : आपण आणि राज ठाकरे भविष्यात कधी एकत्र याल का?
ठाकरे : तो (राज) विषय आता मागे पडला आहे. आम्ही खूप पुढे निघालो आहोत. आता त्यावर बोलणार नाही.

उद्धव ठाकरे यांना काही प्रश्न?
प्रश्न : मग आपण सरकारमधून बाहेर का पडत नाही?
ठाकरे : आम्ही त्यांना संधी देत आहोत. सरकार नोटीस पिरियडवर आहे, हे मी आधीच म्हटले आहे. हिंदुत्वापासून ते दूर पळाले; आम्ही कायम आहोत. अटल-अडवाणींच्या पक्षात मंचावर गुंड दिसत असतील तर तो मंच आम्ही कधीही शेअर करणार नाही. मित्रपक्षाला दाबण्याचे तंत्र त्यांनी अवलंबिले आहे. या सगळ्यांची उत्तरे सत्ता टिकवायची तर त्यांना द्यावी लागतील.

प्रश्न : तुम्हाला हार्दिक चालतो, पण राज का नाही?
ठाकरे : मी हार्दिकला बोलावले नव्हते. शिवाय त्याच्याशी कोणती युतीची चर्चा मी केली नाही. तो नुसता भेटायला आला तर त्यांच्या (भाजपा) पोटात एवढं का दुखलं?

शंकराचार्यांऐवजी गुंडाचार्य हेच फडणवीसांचे परिवर्तन
पूर्वी भाजपाच्या मंचावर संत, महंत अन् शंकराचार्य बसायचे. आता गुंडाचार्य बसू लागले आहेत. फडणवीस यांनी किती मोठे परिवर्तन केले आहे, असा चिमटा उद्धव यांनी काढला. ते म्हणाले, उद्या त्यांच्या मंचावर दाऊदही दिसेल की काय, अशी शंका वाटायला लागली आहे. त्यामुळे आता आणखी काही परिवर्तन करण्याची फडणवीसांना
गरज राहिलेली नाही आणि ते त्यांच्याकडून होणारही नाही.

कोणत्याही परिस्थितीत भाजपासोबत नाही
मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाची साथ घेणार नाही, असे स्पष्ट करीत ठाकरे म्हणाले की, आम्हाला त्यांच्या पाठिंब्याची आवश्यकताच भासणार नाही. आमची स्वबळावर सत्ता येणारच.

Web Title: Khadki Khatki loved!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.