खडसे हे तर भाजपातील भुजबळ - दमानिया
By admin | Published: May 26, 2016 01:21 AM2016-05-26T01:21:19+5:302016-05-26T01:21:19+5:30
महसूलमंत्री एकनाथ खडसे हे तर भाजपामधील भुजबळ आहेत, असा आरोप करत मी त्यांच्या जमिनी, संस्था यांची माहिती घेऊन ती जनतेसमोर आणणार आहे, असा दावा सामाजिक
जळगाव : महसूलमंत्री एकनाथ खडसे हे तर भाजपामधील भुजबळ आहेत, असा आरोप करत मी त्यांच्या जमिनी, संस्था यांची माहिती घेऊन ती जनतेसमोर आणणार आहे, असा दावा सामाजिक कार्यकर्र्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
महसूलमंत्री खडसे यांच्या मोबाइलवर कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिमच्या घरून आलेले कथित फोनकॉल्स, जावयाची लिमोझीन कार आणि पुण्यातील जमीन खरेदीमुळे खडसे सध्या चांगलेच अडचणीत आले आहेत.
या प्रकरणांवरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असताना दमानिया यांनी तापी पाटबंधारे महामंडळांतर्गत असलेल्या लोअर तापी प्रकल्पाच्या गेटचे काम, तापी नदीवरील तीन पुलांचे बांधकाम आणि खडसेंच्या मतदारसंघातील कुऱ्हा वढोदा उपसा योजनेची सविस्तर माहिती घेतली. ती पुरविण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये एकच धावपळ सुरू होती. ही माहिती मिळावी यासाठी दमानिया पाटबंधारे विभागाच्या गिरणा या कार्यालयात रात्रीपर्यंत बसून
होत्या.
दमानिया म्हणाल्या, दोन सिंचन प्रकल्पांमध्ये गंभीर प्रकार घडले आहेत. लोअर तापीचे काम श्रद्धा कन्स्ट्रक्शनचे शिवाजी जाधव यांना दिले गेले आहे. त्यांची सविस्तर माहिती प्राप्त झाल्यावर ती उघड करीन. ते त्या जमिनींवर काय शेती करतात हे बघायचे आहे, असेही दमानिया म्हणाल्या. (प्रतिनिधी)