खडसे-दाऊद कॉल; ठोस पुरावे द्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2016 04:21 AM2016-06-15T04:21:45+5:302016-06-15T04:21:45+5:30
महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम यांच्यात संभाषण झाल्याचे ठोस पुरावे सादर करा, असे निर्देश गुजरातच्या हॅकरला देत उच्च न्यायालयाने त्याला याचिकेत सुधारणा
मुंबई : महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम यांच्यात संभाषण झाल्याचे ठोस पुरावे सादर करा, असे निर्देश गुजरातच्या हॅकरला देत उच्च न्यायालयाने त्याला याचिकेत सुधारणा करण्याची सूचनाही केली. उच्च न्यायालयाने याचिकेत नमूद करण्यात आलेल्या मुद्द्यांवर अनेक प्रश्नही उपस्थित केले.
महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या नावाने नोंद केलेल्या मोबाइल नंबरवरून पाकिस्तानमध्ये वास्तव्यास असलेला कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याला अनेक कॉल करण्यात आल्याचा दावा गुजरातचा हॅकर मनिष भंगाळे याने केला आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भंगाळे याने याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. प्रकाश देव यांच्या खंडपीठापुढे होती.
‘दाऊदला आठ वेळा कॉल केला म्हणजे गुन्हा ठरतो का? काय संभाषण झाले, हे महत्त्वाचे आहे. याविषयी पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला का?’ अशी विचारणा अॅड. सावंत यांच्याकडे न्यायालयाने केली.
खडसे आणि दाऊद यांच्यात काय संभाषण झाले, याचीच चौकशी करायला पाहिजे, यासाठीच ही याचिका दाखल करण्यात आली, अशी माहिती अॅड. सावंत यांनी खंडपीठाला दिली.
तसेच खडसे प्रकरणी भंगाळेची गुन्हे अन्वेषण विभागाने पाच तास चौकशी केली तरीही या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात न घेता गुन्हे अन्वेषण विभागाने खडसेंना क्लीन चिट दिली. आता पुन्हा एटीएसप्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र भंगाळे जाणार नसल्याचेही अॅड. सावंत यांनी खंडपीठाला सांगितले. त्यावर खंडपीठाने याचिकाकर्त्याला ठोस पुरावे सादर करून याचिकेत सुधारणा करण्याचे निर्देश देत याचिकेवरील पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर ठेवली आहे. (प्रतिनिधी)
मेहजबीन शेख कोण?
भंगाळे याने खडसेंच्या मोबाइलवरून मेहजबीन शेख हिला कॉल केल्याचे याचिकेत म्हटले आहे. त्यावर खंडपीठाने मेहजबीन शेख कोण आहे, अशी विचारणा याचिकाकर्त्याचे वकील संदेश सावंत यांच्याकडे केली. मेहजबीन शेख ही दाऊदची पत्नी असल्याची माहिती अॅड. सावंत यांनी खंडपीठाला दिली.