वाढदिवसानिमित्त आमदाराची ‘खड्डे भेट’

By Admin | Published: July 22, 2016 05:39 AM2016-07-22T05:39:57+5:302016-07-22T05:39:57+5:30

शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महानगर पालिकेवर रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सध्या टीकेची झोड उठलेली आहे.

'Khadse Gate' for the birthday celebration | वाढदिवसानिमित्त आमदाराची ‘खड्डे भेट’

वाढदिवसानिमित्त आमदाराची ‘खड्डे भेट’

googlenewsNext

मनीषा म्हात्रे,

मुंबई- शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महानगर पालिकेवर रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सध्या टीकेची झोड उठलेली आहे. त्यात शिवसेना आमदाराच्या वाढदिवसानिमित्त पूर्व उपनगरातील रस्त्यांवर खड्डे खणून बॅनर उभारण्यात आले आहेत. या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मुंबईकर हैराण असताना या आमदाराने वाढदिवसानिमित्त मुंबईकरांना खड्ड्यांची भेट दिल्याची चर्चा सध्या पूर्व उपनगरांत रंगलेली आहे.
भांडुप पूर्व-विक्रोळी विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांचा वाढदिवस बुधवारी, २० जुलै रोजी साजरा झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे मोठ-मोठे बॅनर पूर्व उपनगरातील मुलुंड ते घाटकोपर, तसेच पवईपर्यंत उभारण्यात आले. बॅनर लावताना त्याचे खांब उभे करण्यासाठी खड्डे खणण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, विक्रोळी कन्नमवार परिसरात लागलेल्या बॅनरखाली आधीच रस्त्यांची दुरवस्था झाली होती. त्यातच खड्डे खणून बॅनर उभे केले आहेत. हे खड्डे एका बाजूला असले, तरी बॅनर काढल्यानंतर हे खड्डे पादचाऱ्यांसाठी त्रासदायक ठरणारे आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून महापालिकेने शहरातील बॅनरबाजीला लगाम घालण्यासाठी धोरण आखले आहे. त्यात राजकीय पक्ष आणि व्यावसायिक संस्थांना बॅनर लावण्यास मनाई करण्यात आली. राजकीय पक्षांचे कार्यक्रम, मेळावे व अधिवेशनासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी १० बाय १० चौरस फुटांचे फक्त दोनच फलक लावण्याची परवानगी देण्यात आली, तसेच गणेशोत्सव, नवरात्रौत्सवादरम्यान रस्त्यांवर मंडप उभारण्यासाठी रस्त्यांवर खड्डे खणण्यास पालिका प्रशासन मनाई करते. असे असतानाही शिवसेनेतील वजनदार नेत्याचा भाऊ असलेल्या या आमदारासाठी, पालिकेचे नियम पायदळी तुडवून वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर झळकत आहेत. याबाबत पालिका पूर्व उपनगरचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते संपर्क होऊ शकला नाही.
वाढदिवसाला गँगस्टरची हजेरी
नुकताच कांजूरमार्ग येथील कंत्राटदाराला मारहाण करून खंडणी मागितल्याप्रकरणी, जामिनावर बाहेर आलेला कुमार पिल्लई गँगचा गँगस्टर मयूर शिंदेने राऊतांच्या वाढदिवसाला हजेरी लावली. एकीकडे शिंदेशी आपला काहीही संबंध नाही म्हणणारे आमदारांच्या पार्टीत मात्र, तो त्यांच्या शेजारी उभा असलेला दिसून आला. शिंदे यानेही आमदारांसाठी शुभेच्छा फलक भांडुपमध्ये लावले आहेत.
>खड्डे खणून बॅनर लावल्याचा इन्कार
रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी मी पाठपुरावा करत आहे.
माझ्या वाढदिवसानिमित कोठेही खड्डे खणून बॅनर लावण्यात आलेले नाहीत. विक्रोळी जनता मार्केट परिसरात ज्या बॅनरचा
उल्लेख आपण करत आहात, तो माझ्या विभागातील नाही, शिवाय त्यासाठीही खड्डा खणला असेल, असे मला वाटत नाही.
- सुनील राऊत,
आमदार, शिवसेना

Web Title: 'Khadse Gate' for the birthday celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.