खडसेंचा चौकशी अहवाल ८ दिवसांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 04:37 AM2018-04-24T04:37:15+5:302018-04-24T04:37:15+5:30

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाने खडसेंविरोधात गुन्हा नोंदविला.

Khadse inquiry report in 8 days | खडसेंचा चौकशी अहवाल ८ दिवसांत

खडसेंचा चौकशी अहवाल ८ दिवसांत

Next

मुंबई : माजी महसूलमंत्री व आमदार एकनाथ खडसे यांच्याविरोधात केलेल्या चौकशीचा अहवाल येत्या ८ दिवसांत उच्च न्यायालयासमोर सादर करू, असे आश्वासन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रभारी प्रमुख विवेक फणसाळकर यांनी दिले आहे. खडसेंविरोधात चौकशी होऊनही, त्याचा अहवाल सादर होत नसल्याच्या निषेधार्थ दमानिया यांनी सोमवारी आझाद मैदानात निदर्शने केली. त्यानंतर, झालेल्या भेटीत फणसाळकर यांनी संबंधित आश्वासन दिल्याचा दावा दमानिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.
दमानिया यांनी सांगितले की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाने खडसेंविरोधात गुन्हा नोंदविला. मात्र, त्यानंतर झालेल्या चौकशीचा अहवाल उघड केलेला नाही. त्यामुळे तो उघड करण्याची मागणी करत, आज आंदोलन करण्यात आले. दरम्यान, फणसाळकर यांची भेट घेतली असता, तो तत्काळ उघड करण्याची मागणी केली. मात्र, फणसाळकर यांनी येत्या ८ दिवसांत तो न्यायालयासमोर सादर करण्याचे आश्वासित केले आहे. त्यामुळे दिलेल्या मुदतीत एसीबीने अहवाल सादर केला नाही, तर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला आहे.

अहवाल गुलदस्त्यात
एसीबी चौकशी अहवालासह खडसेंची चौकशी करणाऱ्या झोटिंग समितीच्या अहवालावर दमानिया यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या म्हणाल्या की, शासनाकडून झोटिंग समितीवर पैसा खर्च करण्यात येत असला, तरी अद्याप समितीचा अहवाल गुलदस्त्यातच आहेत. तो तत्काळ उघड करण्याची गरज आहे. दुसरीकडे आमदार असूनही खडसे यांच्या सुरक्षेवर शासनाकडून दररोज ४२ हजार रुपये खर्च केला जात आहे. सरकारने गेल्या २० महिन्यांत खडसे यांच्या सुरक्षेवर तब्बल २ कोटी ५५ लाख ८६ हजार ४०० रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे मंत्री असताना पुरविली जाणारी सुरक्षा आता ते केवळ आमदार असल्याने काढून घेण्याची गरज पोलीस प्रशासनाकडे व्यक्त केली आहे. त्यावर रिव्ह्यू कमिटीचा अहवाल आल्यावर, सुरक्षेसंदर्भात निर्णय घेणार असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले, असेही दमानिया म्हणाल्या.

Web Title: Khadse inquiry report in 8 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.