अधिकारांवरून खडसे-राठोड वाद सुरूच

By admin | Published: February 13, 2015 01:35 AM2015-02-13T01:35:18+5:302015-02-13T01:35:18+5:30

अधिकार हस्तांतरावरून महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि राज्यमंत्री संजय राठोड यांच्यातील शीतयुद्ध अजुन पुरते शमलेले दिसत नाही

Khadse-Rathod dispute continued with rights | अधिकारांवरून खडसे-राठोड वाद सुरूच

अधिकारांवरून खडसे-राठोड वाद सुरूच

Next

मुंबई : अधिकार हस्तांतरावरून महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि राज्यमंत्री संजय राठोड यांच्यातील शीतयुद्ध अजुन पुरते शमलेले दिसत नाही. खडसेंकडून आपल्याला अधिकार मिळत नसल्याची तक्रार राज्यमंत्री राठोड यांनी केली असताना आपण १९ दिवसांपूर्वीच त्यांना अधिकार प्रदान केले आहेत, असे खडसे यांनी आज सांगितले.
राज्य मंत्रिमंडळातील भाजपाचे कॅबिनेट मंत्री त्यांच्या खात्याच्या राज्यमंत्र्यांकडे अधिकार हस्तांतरीत करीत नसल्याची तक्रार शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांनी केली आहे. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी याबाबत जाहीर वाच्यता करून या प्रकरणाला तोंड फोडले. याबाबत बातम्या प्रसिद्ध होताच, खडसे यांनी तातडीने खुलासा करत राठोड यांच्याकडे वर्ग केलेल्या या अधिकारांची प्रतच पत्रकारांसमोर सादर केली. भूमापन व जमाबंदी, नगर भूमापन, शसकीय तलावातील मासेमारीसंबंधीचे अधिकार देणे, कुळवाट अधिनियम, अनूसुचित जमातीच्या जमिनींबाबतचे अधिकार, सीमा चिन्हे, नैसर्गिक व सर्वसाधारण आपत्तीतील पिडितांना मदतकार्य, जमीन महसूल आकारणी, वसुली, सूट व निलंबन, धारण जमिनींचे एकत्रिकरण आणि देवस्थान इनाम प्रशासकीय मान्यतेची प्रकरणे राठोड यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत.
देवस्थान इनाम जमिनी व आदिवासी व्यक्तींकडील जमिनींबाबत आधी च्या राज्यमंत्र्यांनी पारित केलेल्या आदेशाबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत ही प्रकरणे राज्यमंत्र्यांकडे दिली जाणार नाहीत. तेच अधिकार राठोड यांना हवे आहेत. ही प्रकरणे संवेदनशील असल्याने राज्यमंत्र्यांनी त्या बाबतचा आग्रह धरणे योग्य नाही, असे खडसे यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Khadse-Rathod dispute continued with rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.