खडसे यांनी पुराव्यानिशी नावे जाहीर करावीत; गिरीश महाजन यांचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 05:02 PM2019-12-06T17:02:48+5:302019-12-06T17:04:07+5:30
विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांना पाडणा-यांची नावे एकनाथराव खडसे यांनी पुराव्यानिशी जाहीर करावीत
जळगाव - विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांना पाडणा-यांची नावे एकनाथराव खडसे यांनी पुराव्यानिशी जाहीर करावीत, असे आव्हान माजी मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना दिले आहे. जळगावात शुक्रवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले की, कुणीच कुणाला पाडत नसते. मुक्ताईनगर मतदारसंघातून खडसे हे यापूर्वी १२०० आणि त्यानंतर ८५०० हजार मतांनी निवडून आले आहेत. यावेळी खडसे यांना तिकीट नव्हते. त्यामुळे फरक पडला. यावेळी तिथे अटीतटीचा सामना होता. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष तिथे एकत्र आले होते. तसेच भाजपामधून १२ आमदार बाहेर पडणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. आमच्या पक्षातून एकही आमदार बाहेर पडणार नाही, असा दावासुद्धा महाजन यांनी केला.
भाजपामधील सर्वात महत्त्वाची पदे ओबीसींकडे आहेत. आपण स्वत: ओबीसी आहोत. कुणी पक्ष सोडून जाईन, नाराज आहेत, हे सर्व कपोलकल्पित आहे. अपयश आल्याने थोडे दिवस असे घडत असते, असेही ते म्हणाले.