खडसेंनीच आत्मचिंतन करावे, गिरीश महाजन यांचा हल्लाबोल; फडणवीस एकटे पक्ष चालवत नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 07:17 AM2020-10-23T07:17:14+5:302020-10-23T07:18:04+5:30
खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे व इतरही आरोप झाले. माझ्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कधीही आरोप केले नाहीत असे खडसे आज सांगतात; पण त्यावेळच्या विरोधी पक्षाने त्यांच्या राजीनाम्यासाठी राजभवनावर जाऊन राज्यपालांना निवेदन दिले होते, सभागृहातदेखील आरोप केले होते, याकडे महाजन यांनी लक्ष वेधले.
मुंबई :देवेंद्र फडणवीस यांनी छळ केल्यामुळे पक्ष सोडल्याचा खडसेंनी केलेला कांगावा अत्यंत चुकीचा असून पक्ष सोडण्याची पाळी का आली याचे आत्मचिंतन त्यांनी केले तर नवीन पक्षात ते सुखी राहतील, असा हल्लाबोल माजी मंत्री आणि जळगाव जिल्ह्यातील भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी लोकमतशी बोलताना केला.
खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे व इतरही आरोप झाले. माझ्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कधीही आरोप केले नाहीत असे खडसे आज सांगतात; पण त्यावेळच्या विरोधी पक्षाने त्यांच्या राजीनाम्यासाठी राजभवनावर जाऊन राज्यपालांना निवेदन दिले होते, सभागृहातदेखील आरोप केले होते, याकडे महाजन यांनी लक्ष वेधले. खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यावेळच्या परिस्थितीसाठी फडणवीस कसे जबाबदार असतील. भाजपच्या कोणत्याही नेत्याबाबत होणारा निर्णय हा सामूहिक असतो. मात्र, फडणवीस यांना टार्गेट करणे खडसेंना सोपे वाटत असावे, असा टोलाही महाजन यांनी हाणला.
खडसे राष्ट्रवादीत गेल्याने जळगाव जिल्ह्यात भाजपचे मोठे नुकसान होईल का, या प्रश्नात महाजन म्हणाले की, काहीही फरक पडणार नाही. लहानमोठ्या निवडणुकांमध्ये तुम्हाला ते दिसेलच. भाजप व्यक्तिकेंद्रित पक्ष नाही. कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जिल्ह्यातील जनता भाजपसोबत कालही होती, उद्याही राहील. मी आज काही बोलणार नाही पण भाजपत असताना पक्षाविरुद्ध कुठे कुठे कोणी काय काय केले ते योग्यवेळी सांगेन.
पुनर्वसनाची शक्यता संपली होती -
जाणकारांच्या मते, खडसेंच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भक्कमपणे फडणवीस यांच्या बाजूने उभे राहिले. खडसेंनी काहीही बोलायचे आणि ते पक्षाने सहन करून घ्यायचे, हे होणार नाही.
आज खडसेंचे सहन केले तर उद्या आणखी कोणी नेता बोलू लागेल. त्यामुळे खडसेंबाबत तडजोड करायची नाही, असा स्पष्ट निरोप भाजप श्रेष्ठींकडून होता, असे म्हटले जाते. त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्याशी शेवटपर्यंत चर्चा केली पण राजकीय पुनर्वसनाचा कोणताही शब्द दिलेला नव्हता.त्यामुळे फडणवीस यांच्यावर टीका करत त्यांनी पक्ष सोडला.
बाहेर का फेकले गेले ?
फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या खुर्चीचा जो मान भाजपमधील त्यांचे विरोधक मानले जाणाऱ्या नेत्यांनी ठेवला तो खडसे यांनी कधीही ठेवला नाही. अनेकदा ते फडणवीस यांची जात, कनिष्ठता यावरून बोलत असल्याचे अनेक जण सांगतात. त्यातच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. या सगळ्या बाबींची नोंद मोदी-शहांकडे होत गेली आणि त्यातून खडसे बाहेर फेकले गेले अशी चर्चा भाजपमध्ये आहे.