‘खडसेंची चौकशी न्यायाधीशांमार्फत करा’
By Admin | Published: June 3, 2016 03:20 AM2016-06-03T03:20:05+5:302016-06-03T03:20:05+5:30
महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपांची निवृत्त न्यायधीशांमार्फत चौकशी करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली असून
मुंबई : महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपांची निवृत्त न्यायधीशांमार्फत चौकशी करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली असून, गुरुवारपासून त्यांनी आजाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
दमानिया म्हणाल्या की, ‘खडसे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करून २० दिवस उलटले आहेत, तरीही त्यांच्यावर कारवाई होत नाही. म्हणून आमच्यावर उपोषण करण्याची वेळ आली आहे. खडसे यांच्याकडून केवळ महसूल खाते काढून प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी खडसे यांना मंत्रिमंडळातून काढून निवृत्त न्यायाधीशांकडून ६ महिन्यांत त्यांची चौकशी करावी.’ भंगाळेचेही उपोषण
दाऊद कॉलप्रकरणी खडसेंवर गंभीर आरोप करणारा हॅकर मनिष भंगाळे देखील शुक्रवारपासून या आंदोलनात सामील होणार आहे.
‘एकनाथ खडसे यांच्यावर जाणूनबुजून भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. विरोधकांनी चालवलेले हे एक षडयंत्र आहे,’ असा दावा करत खडसे समर्थकांनी आजाद मैदानात निषेध सभा घेतली. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसैन खान, ऊर्दु साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष अब्दुल रऊफ खान आदींनी दमानिया आणि आपच्या नेत्या प्रीती मेनन यांच्यावर सुपारीबाज म्हणून आरोप केले.