खडसेंची धमकी पक्षाला की नेत्यांना?
By admin | Published: July 1, 2016 06:02 AM2016-07-01T06:02:05+5:302016-07-01T06:02:30+5:30
मी तोंड उघडले तर देश हादरला असता, असा गर्भित इशारा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिल्याने भाजपात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मुंबई/जळगाव : माझ्याविरोधात ठरवून कारस्थान केले गेले. पण मी तोंड उघडले तर देश हादरला असता, असा गर्भित इशारा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिल्याने भाजपात प्रचंड खळबळ उडाली आहे. खडसेंचा हा इशारा पक्षाला आहे की, पक्षातील एखाद्या विशिष्ट नेत्याला, यावर खल सुरू झाला असल्याचे समजते.
भ्रष्टाचाराच्या आरोपावरून मंत्रिपद सोडावे लागलेल्या खडसे यांनी काल जळगावात बोलताना बाहेरच्यांबरोबर पक्षांतर्गत विरोधकांचाही समाचार घेतला. मुंबईतील भाजपा कोअर कमिटीची मीटिंग आटोपून खडसे जळगावात आले होते. त्यांच्यासमवेत पक्षाचे प्रदेश संघटन मंत्री रवी भुसारी हेदेखील होते. दोघांच्याही चेहऱ्यावर तणाव जाणवत होता. यावरून कोअर कमिटीत बरेच काही झाले असावे, असा तर्क काढला जात आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही नाथाभाऊंच्या पाठीशी असल्याचे सांगत, खडसेंना पाण्यात पाहणाऱ्यांचा आपण निषेध करतो, असे सूचक वक्तव्य भुसारी यांनी केल्याने अनेकांच्या भुवया आधीच उंचावल्या होत्या. त्यानंतर स्वत: खडसे यांनी वरील सूचक वक्तव्य केले. खडसे म्हणाले, पक्षातील एक ज्येष्ठ नेता म्हणतो खडसेंनी घरात पदे दिली. ताकद असेल तर गावात सरपंच होऊन दाखवा. आपल्यात राहून गद्दारी करत असेल तर त्याला तेथेच धडा शिकवा... यापुढे आपला कोण ते ओळखा. नाथाभाऊंमुळे जे मोठे झाले तेच मागे कुरबुर करत असतील तर त्यांनी भूतकाळ आठवला पाहिजे. पक्षाच्या जिवावर सेटिंग कधी केली नाही, असे चिमटे त्यांनी एका नेत्याचे नाव न घेता काढले.
खडसे यांच्या वक्तव्यानंतर भाजपात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून, प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी खडसेंना फोन करून ‘जरा सबुरी घ्या’ असा सल्ला दिल्याचे समजते. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनीदेखील त्यांना ‘कमी बोला, बोलून प्रॉब्लेम वाढवू नका,’ असा सल्ला दिला होता. परंतु तरीही खडसेंच्या मनातील खदखद काल बाहेर पडलीच. (विशेष प्रतिनिधी)
>एकनाथ खडसेंची सारवासारव
बुधवारी जळगावात ‘देश हादरवून’ सोडण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर आज यू-टर्न घेत खडसेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
भुसावळ येथील नवीन तहसील कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना ते म्हणाले, ‘मी गौप्यस्फोट करतो असे म्हणालो नव्हतो, तर मोदींचा एक मंत्री (म्हणजे ते स्वत:) दाऊदच्या संपर्कात असल्याचे सिद्ध झाले असते, तर देश हादरला असता, असे मला म्हणायचे होते.’
खडसे तोंड उघडा : खडसे हे विरोधी पक्षनेते असताना आपण कोणतेही वक्तव्य पुराव्याशिवाय करत नाही असे नेहमी सांगायचे. मी तोंड उघडले तर देश हादरून जाईल, असे वक्तव्य त्यांनी आता केले आहे. म्हणजेच त्यांच्याकडे त्याबाबतचे पुरावेही आहेत असा अर्थ होतो. त्यांना ही माहिती दाऊदने दिली की, त्यांच्या पक्षातील केंद्रीय किंवा राज्यमंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती त्यांच्याकडे आहे, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
>खडसेंनी ‘तो’ गौप्यस्फोट करावाच - राधाकृष्ण विखे
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी देश हादरविणारी ‘ती’ माहिती एकदा उघड करावीच, ती दडवून ठेवणे देशहिताचे नाही. त्यामुळे खडसेंनी तो गौप्यस्फोट करावाच, असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला आहे. विखे म्हणाले, खडसेंकडे धक्कादायक व संवेदनशील माहिती असतानाही ते बोलणार नसतील तर त्यांनी का व कोणत्या स्वार्थासाठी मौन बाळगले, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे देश हादरण्याची चिंता सोडून खडसेंनी ती माहिती उघड करण्याची गरज आहे.