खडसेंची गच्छंती अटळ

By admin | Published: June 3, 2016 03:52 AM2016-06-03T03:52:07+5:302016-06-03T03:52:07+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिल्ली भेटीत पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपा पक्षाध्यक्ष शहा यांच्याशी सविस्तर चर्चा केल्याने खडसे यांची मंत्रिमंडळातून गच्छंती अटळ मानली जात आहे.

Khadseen's fencing is inevitable | खडसेंची गच्छंती अटळ

खडसेंची गच्छंती अटळ

Next

नवी दिल्ली / मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विविध आरोपांनी घेरलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यासाठी चहूबाजूंनी दबाव वाढला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिल्ली भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपा पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी सविस्तर चर्चा केल्याने खडसे यांची मंत्रिमंडळातून गच्छंती अटळ मानली जात आहे.
खडसे यांच्यासंदर्भात मुंबईपासून दिल्लीपर्यंत गुरुवारी दिवसभर अत्यंत वेगाने काही घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी खडसेंवरील आरोपांबाबतचा आपला अहवाल अमित शहा यांच्याकडे सादर केला. उभयतांमध्ये तब्बल ४0 मिनिटे चर्चा झाली. भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘खडसेंबाबत जी प्रकरणे सामोरी आली, त्याबाबतचा अहवाल पक्षाध्यक्षांनी मागवला होता. त्यानुसार, मी तो सादर केला असून, आता पक्षाध्यक्षच काय ती उचित कारवाई करतील.’ मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य सूचक मानले जात आहे.
आरोपांच्या खिंडीत अडकलेले खडसे सध्या भाजपामध्ये एकाकी पडले आहेत. पक्षाच्या महासचिव आणि महाराष्ट्राच्या प्रभारी खासदार सरोज पांडे यांनी ३ दिवसांपूर्वी खडसेंची भेट घेतली. या भेटीत खडसेंची बाजू त्यांनी समजावून घेतली. या चर्चेचे सारे रेकॉर्डेड तपशील पांडेंनी फोनवर पक्षाध्यक्ष शहा यांना ऐकवले. पक्षाचे खासदार सत्यपालसिंग यांनी तर भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून आजवर खडसे दुसऱ्या नेत्यांचे राजीनामे मागत होते, आता त्यांच्यावरच आरोप झाले आहेत. त्यामुळे त्यांनी स्वत:च निर्णय घेणे उचित ठरेल, असे सूचक वक्तव्य केले.
आरोप होताच संबंधित नेत्याला पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडणे, असा काँग्रेसप्रमाणे भाजपाचा आजवरचा लौकिक नाही. त्यामुळे पक्षाध्यक्ष शहा खडसेंबाबत नेमका काय निर्णय घेतात, याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागलेले आहे.

खडसे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याऐवजी त्यांनी स्वत:च राजीनामा देण्याची भूमिका घ्यावी, असा सूर पक्षातून उमटत आहे. खडसे यांनी गेले दोन दिवस आपले कुटुंबीय आणि निकटवर्तीयांशी केलेल्या चर्चेत मुख्यमंत्री फडणवीस आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले नसल्याची भावना व्यक्त केली असल्याचे समजते.

शिवसेनेने मागितला राजीनामा

सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेदेखील खडसेंच्या राजीनाम्याची मागणी केल्यामुळे भाजपाची चांगलीच अडचण झाली आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या खडसे यांनी त्यांच्यावर असलेल्या आरोपांची चौकशी होईपर्यंत पद सोडावे. निर्दोषत्व सिद्ध करून सन्मानाने मंत्रिमंडळात यावे, हीच महाराष्ट्राची परंपरा आहे, असे शिवसेनेचे प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी म्हटले आहे.

ओएसडी, स्वीय सहायकाची चौकशी
३० कोटींच्या लाच प्रकरणाची चौकशी करत असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी महसूलमंत्री खडसे यांचा ओएसडी उन्मेष महाजन आणि स्वीय सहायक शांताराम भोई यांचे म्हणणे नोंदविले. या प्रकरणात खडसेंचा निकटवर्तीय गजानन पाटील सध्या कोठडीत आहे.

कारवाईसाठी दमानियांचे उपोषण
खडसे यांनी राजीनामा द्यावा, अथवा मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकून त्यांच्यावरील आरोपांची निष्पक्ष चौकशी करावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गुरुवारपासून आजाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दमानिया यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासमोर उपोषण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारल्याने त्यांनी आजाद मैदान गाठले. दामानिया यांना अनेक सामाजिक संघटना व समविचारी मंडळीकडून पाठिंबा मिळत आहे

अजितदादांचा कित्ता?

आघाडी सरकारच्या काळात सिंचन घोटाळ्यांचे आरोप झाले, तेव्हा अजित
पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता व नंतर आरोपमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र देत ते पुन्हा उपमुख्यमंत्री झाले होते. खडसेंनी हाच कित्ता गिरवावा, असे त्यांच्या समर्थकांच्या मत आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्यावर हवालाकांडात आरोप झाल्यानंतर त्यांनीही राजीनामा दिला होता. खडसे यांनी असेच पाऊल उचलावे, असेही पक्षातील काही नेत्यांचे म्हणणे आहे.

खडसे समर्थकही मैदानात! : खडसे समर्थकांनीही आजाद मैदानात मंडप ठोकून विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतला. खडसे यांच्यावर जाणूनबुजून भ्रष्टाचाराचे आरोप होत असून, त्यांच्याविरोधात विरोधकांनी चालवलेले हे एक षडयंत्र आहे, असा दावा अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसैन खान यांनी केला आहे.


मुंडेंच्या पुण्यतिथीनिमित्त खडसे-पंकजांचे पोस्टर
भाजपाचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची ३ जून रोजी पुण्यतिथी असून, त्या निमित्त खडसे
समर्थकांनी मुंबईभर पोस्टर लावले आहेत. या पोस्टरवर मुंडे यांच्या व्यतिरिक्त महसूलमंत्री एकनाथ खडसे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि त्यांच्या खासदार भगिनी प्रीतम मुंडे यांचेच फोटो आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वगळून खडसे समर्थकांनी नेमका काय संदेश दिला, याचीच सर्वत्र चर्चा होती.

Web Title: Khadseen's fencing is inevitable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.