खडसे यांनी घेतली सरसंघचालकांची भेट
By admin | Published: November 7, 2016 11:44 PM2016-11-07T23:44:10+5:302016-11-07T23:44:10+5:30
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सोमवारी दुपारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ़. मोहन भागवत यांच्याशी तब्बल पाऊण तास बंदद्वार चर्चा केली़.
ऑनलाइन लोकमत
भुसावळ (जि. जळगाव), दि. 7 - माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सोमवारी दुपारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ़. मोहन भागवत यांच्याशी तब्बल पाऊण तास बंदद्वार चर्चा केली़. रा.स्व. संघाच्या अ.भा. शारिरीक वर्गासाठी डॉ. मोहन भागवत भुसावळात आले आहेत. बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये हा वर्ग सुरू आहे.
भागवत व खडसे यांच्यातील चर्चेचा तपशील बाहेर आला नसला तरी खडसे यांनी दिलेला मंत्रीपदाचा राजीनामा, न्या.झोटींग समितीमार्फत होणारी चौकशी व आता पुढे काय आदी बाबींवर त्यांची चर्चा झाल्याची माहिती मिळाली.
खडसे यांचा मंत्रिमंडळातील समावेशाबाबतही यावेळी चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. चर्चेवेळी केवळ दोघेच उपस्थित होते हे विशेष. राजीनाम्यानंतरच्या घडामोडीबाबात खडसे यांनी भागवत यांना माहिती दिली व आपली बाजू मांडली तसेच आपल्यावर कसा अन्याय झाला याबाबत भागवत यांना अवगत केल्याचे समजते. दरम्यान, एकनाथराव खडसे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की डॉ़मोहन भागवत यांची आपण केवळ सदिच्छा भेट घेतली़.
दरम्यान, डॉ. मोहन भागवत यांनी सोमवारी शारीरीक वर्गात सहभागी झालेल्या देशभरातील ४१ प्रांतातील ४६० प्रतिनिधींशी सरसंघचालकांनी संवाद साधला़