खामगावातील अर्भक दिल्लीत, ३५ लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 04:18 AM2017-10-02T04:18:14+5:302017-10-02T04:18:23+5:30
खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयातून २७ सप्टेंबर रोजी पळविण्यात आलेल्या अर्भकाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
बुलडाणा : खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयातून २७ सप्टेंबर रोजी पळविण्यात आलेल्या अर्भकाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. अपहृत बाळ दिल्लीत सुखरूप सापडल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. तीन दिवसांतच पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून न्यायालयाच्या आदेशाने बाळ आई-वडिलांना सोपविण्यात आले. दरम्यान, या बाळाची विक्री करण्यासाठी अपहरण करण्याचे आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथील सुमय्याबी आतीकखान या महिलेचे ५ दिवसांचे बाळ २७ सप्टेंबर रोजी पहाटे एका बुरखाधारी महिलेने पळविले. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या प्रकारणाचा समांतर तपास खामगाव शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला. स्थानिक गुन्हे शाखेने गुन्ह्याच्या तपासात ३ वेगवेगळे पथक तयार केली.
गुन्ह्यात वापरलेल्या वाहनावरून पोलिसांनी औरंगाबाद येथील नवीन बायजी पुरा येथील चालक राजे जहांगीर खान(४०), वाहन भाड्याने करून देणारा इरफान खान बशीर खान (२८) यांना ताब्यात घेतले. हे कळताच मुख्य आरोपी मोहसीन हुसेन खान, त्याची पत्नी प्रीती दाविद गायकवाड व तिची आई वेदिका किशोर पिल्ले हे तिघे जण तेथून पसार झाले.
मुख्य आरोपी दौंड येथून पुण्याकडे यत असल्याची माहिती मिळाल्यानंतर दौंड रेल्वे पोलिसांच्या मदतीने मुख्य आरोपी मोहसीन हुसेन खान (२१), त्याची पत्नी प्रीती दावीद गायकवाड (पिल्ले, रा. खामगाव) यांना दौंड येथून ताब्यात घेतले. त्याचवेळी अन्य पथकाने दिल्ली येथून मल्लिका बेगम पठाण हिंमत खान (रा. बाजार सावंजी जि. औरंगाबाद), फिरदोस अस्लम आसमानी (रा. गल्ल नं.९ वजीराबाद, दिल्ली) यांना अटक केली. त्यांच्याकडून बालकाची सुखरुप सुटका केली.
हे अर्भक खामगाव येथून इंडिका कारने सिल्लोड व नंतर औरंगाबाद येथे नेण्यात आले. त्याचा सौैदा आधी सिल्लोड व नंतर औरंगाबाद येथे होणार होता. पण पोलीस पाठलाग करीत असल्याची कुणकुण लागल्याने आरोपींनी त्याला औरंगाबाद येथून विमानाने दिल्लीला नेले व मूल नसलेल्या या कोट्यधीश दाम्पत्याला विकले.
हे दाम्पत्य कोट्यधीश असून त्यांना मूल बाळ होत नसल्याने त्यांनी प्रीती व मोहसीन यांच्याशी ३५ लाखांत एक बाळाचा सौदा केला होता. या दाम्पत्याने ७ लाख रुपये अॅडव्हान्सही दिले होते.
बाळ १२ तास उपाशी
खामगाव येथून पळविलेले बाळ विमानाने दिल्लीपर्यंत गेले खरे, पण या काळात त्याला साधे दुधसुद्धा आरोपींनी पाजले नाही.