खैरेंच्या ‘दादा’गिरीवर जंजाळांची ‘भाई’गिरी!
By Admin | Published: April 22, 2016 03:18 AM2016-04-22T03:18:54+5:302016-04-22T03:18:54+5:30
स्वपक्षातीलच; परंतु आपल्याला न जुमानणाऱ्या, विरोधी गटातील स्थानिक पदाधिकाऱ्यांवर खा.चंद्रकांत खैरे हे अधूनमधून वाटेल त्या भाषेत, वाटेल ते आरोप करीत असतात
औरंगाबाद : स्वपक्षातीलच; परंतु आपल्याला न जुमानणाऱ्या, विरोधी गटातील स्थानिक पदाधिकाऱ्यांवर खा.चंद्रकांत खैरे हे अधूनमधून वाटेल त्या भाषेत, वाटेल ते आरोप करीत असतात. स्थानिक पदाधिकाऱ्यांवर खा. खैरेंची ‘दादागिरी’ सतत पाहायला मिळते. या ‘दादागिरी’ला गुरुवारी मात्र, सेनेचेच मनपा सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनीही चक्क खैरेंच्या घरी जाऊन ‘भाई’गिरी स्टाईल आव्हान दिले. ‘वेळ पडली तर जंजाळचे तंगडे तोडेल’ या खासदारांच्या धमकीने भडकलेले जंजाळ हे गुरुवारी सकाळी ‘आलोय तुमच्या घरी, एकटाच आहे, हिंमत असेल तर दाखवा तंगडे तोडून’ अशा आविर्भावात थेट खैरेंच्या बंगल्यावर धडकले; परंतु सुदैवाने खैरे दिल्लीत असल्याने मोठा संघर्ष टळला.
जंजाळ यांनी दाखविलेल्या या ‘भाई’गिरीने सेनेत एकच खळबळ उडाली आहे. पहिल्यांदाच खैरेंच्या दादागिरीला पक्षातूनच असे उघडउघड आव्हान मिळाले आहे, हे विशेष!
गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादेत शिवसेनेत मोठ्या प्रमाणात अंतर्गत धुसफूस सुरू आहे. खासदार खैरे यांची ‘मातोश्री’वर चलती असल्याने आतापर्यंत सेनेचे स्थानिक पदाधिकारी त्यांचे म्हणणे निमूटपणे ऐकून घेत होते. मात्र, रामदास कदम यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यापासून खा. खैरेंच्या विरोधकांना चांगलेच बळ मिळाले आहे. दोन, चार पदाधिकारी सोडले तर सेनेत स्थानिक पातळीवर कुणीही खैरेंना जुमानत नाही. अनेक कार्यक्रमांमधून खैरे यांना डावलण्यात येत आहे. औरंगाबादेत सरळसरळ खा. खैरेविरुद्ध पालकमंत्री कदम, असे दोन गट पडलेले दिसून येत आहेत. आजघडीला जिल्हाप्रमुखांपासून बहुतांश पदाधिकारी कदम गटात दिसून येतात.
हीच बाब खैरे यांना सतत खटकत आहे. त्यामुळे खैरे हे संधी मिळताच विरोधी पक्षांतील विरोधकांऐवजी स्वपक्षातील आपल्या विरोधकांवरच गरजतात. वाटेल ते आरोप करतात. गेल्या काही महिन्यांत असे अनेकदा घडले. खैरेंच्या शाब्दिक रोषातून सेनेच्या आमदार, जिल्हाप्रमुख, महापौर, नगरसेवकांपर्यंत कुणीही सुटलेले नाही.
कशावरून वादाला फुटले तोंड...
सातारा- देवळाई मनपा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर गुरुवारी खा. चंद्रकांत खैरे यांनी त्यांचे विरोधक समजल्या जाणाऱ्या जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, मनपा सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांच्यावर अत्यंत वाईट भाषेत तोफ डागली. ते म्हणाले, ‘ सातारा- देवळाईत आमचे नियोजन चुकले. अतिआत्मविश्वास नडला. जंजाळ यांना जबाबदारी देऊ नका, असे मी सांगितले होते, तरीही त्यांना जबाबदारी दिली.
जंजाळ यांनी शिवाजीनगरातील संघाच्या शाखा बंद पाडण्याचा केलेला प्रयत्नच या निवडणुकीत आम्हाला भोवला. सेनेत आता ‘दादा’ सेना (अंबादास दानवे यांना त्यांचे समर्थक दादा म्हणतात.) वाढीस लागली आहे. त्याचा फटका पक्षाला बसत आहे. ही ‘दादा’ सेना आपण संपविणार आहोत. एवढ्यावरच खैरे थांबले नाहीत, तर सेना वाढविण्यासाठी मी काय केले हे जंजाळ यांना माहीत नाही. मागे एकदा मी जिल्हाप्रमुखाला फाईट मारली होती. आता वेळ पडली तर जंजाळ यांचे तंगडे तोडेल, अशी धमकीही त्यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली होती.
त्याचबरोबर पालकमंत्री कदम यांच्यावरही नाव न घेता त्यांनी बरीच टीका केली. खैरे यांच्या टीकेकडे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी ‘ते आमचे नेते आहेत’ असे सांगत नित्याप्रमाणे दुर्लक्ष केले; परंतु जंजाळ यांना खैरेंनी दिलेली तंगडे तोडण्याची धमकी फारच जिव्हारी
लागली.
जंजाळांचे ‘फिल्मी स्टाईल’ प्रत्युत्तर
तंगडे तोडण्याच्या धमकीमुळे बिथरलेल्या मनपा सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी अखेर गुरुवारी खा. चंद्रकांत खैरे यांच्या ‘दादागिरी’ला आपल्या ‘भाई’गिरी स्टाईलने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. ‘तुम्ही तंगडे तोडण्याची नुसती धमकी काय देता, हे घ्या आलो तुमच्या घरी, तोही एकटाच. असेल हिंमत तर दाखवा तंगडे तोडून’ अशा आविर्भावात एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणेच गुरुवारी सकाळी जंजाळ आपल्या उघड्या जीपमध्ये एकटेच सुसाट वेगाने खैरे यांच्या रेल्वेस्टेशन परिसरातील डेक्कन मिल आवारात असलेल्या बंगल्यावर पोहोचले.
थेट त्यांनी आपली जीप कम्पाऊंड वॉलच्या गेटमधून आत घातली. जीपमधून उतरून तावातावाने जंजाळ बंगल्याच्या मुख्य दरवाजावर पोहोचले. दरवाजा आतून बंद होता. जोराजोराने त्यांनी दरवाजा वाजविला; मात्र आतून कुणी दरवाजा उघडला नाही. बंगल्यात कुणी तरी होते; परंतु भीतीपोटी दरवाजा उघडण्यात आला नाही, हे दिसून आले.
शेवटी दरवाजा उघडत नाही म्हणून त्रस्त झालेले जंजाळ खैरे यांच्या बंगल्याच्या कम्पाऊंडमध्ये असलेल्या एका दुचाकीवर बसले आणि तेथून ते खैरे यांना फोन लावण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांनी अनेकदा फोन लावला. मात्र, खैरेंनी त्यावेळी फोन काही उचलला नाही. नंतर इतरांना फोन लावून जंजाळ यांनी खासदार कोठे आहेत, याची माहिती घेतली. ते दिल्लीला असल्याचे समजल्यानंतर तावातावाने जंजाळ तेथून पुन्हा ‘फिल्मी स्टाईल’ने निघून गेले.
> खैरे दिल्लीत असल्याने टळला ‘राडा’
आज सभागृह नेते राजेंद्र जंजाळ हे ज्या आविर्भावात खैरे यांच्या बंगल्यावर धडकले होते. त्यावरून जर कदाचित खैरे घरी असते तर तेथे मोठा ‘राडा’ झाला असता, हे निश्चित. सुदैवाने त्यावेळी खैरे हे दिल्लीत होते. अन्यथा चांगलाच ‘संघर्ष’ उडाला असता. अशा पद्धतीने खा. खैरे यांना शिवसेनेतून पहिल्यांदाच कुणी तरी उघडउघड आव्हान दिले आहे, हे विशेष. होय, तो आला होता -खैरे : होय, सकाळी राजेंद्र जंजाळ माझ्या घरी आला होता. मी दिल्लीला होतो. त्यामुळे भेट होऊ शकली नाही. बघू काय म्हणणे आहे त्याचे, अशी प्रतिक्रिया खा. चंद्रकांत खैरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
> यासंदर्भात ‘लोकमत’शी बोलताना राजेंद्र जंजाळ म्हणाले, होय, मी सकाळी खा. खैरे यांच्या डेक्कन येथील बंगल्यावर गेलो होतो. त्यांनी माझे तंगडे तोडण्याची धमकी दिली. माझ्यावर त्यांची काय घृणा आहे. मी त्यांचा लोकसभेचा स्पर्धकही नाही. कसे तंगडे तोडतात, याचा जाब विचारण्यासाठीच त्यांच्या घरी एकटाच गेलो होतो.