‘खाकी’ घेणार दीर्घ श्वास
By admin | Published: June 19, 2017 02:44 AM2017-06-19T02:44:21+5:302017-06-19T02:44:21+5:30
समाजात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी वर्षातील बारा महिने अहोरात्र ड्युटी व बंदोबस्तामध्ये व्यस्त असणारे राज्यातील दोन लाखांवर खाकी वर्दीवाले येत्या बुधवारी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : समाजात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी वर्षातील बारा महिने अहोरात्र ड्युटी व बंदोबस्तामध्ये व्यस्त असणारे राज्यातील दोन लाखांवर खाकी वर्दीवाले येत्या बुधवारी (दि. २१) जूनला अनुलोम विलोम, कपालभाती करत असल्याचे पाहावयास मिळणार आहे. राज्यातील सर्व पोलीस घटकांमध्ये योग
प्रशिक्षण शिबिर होणार आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बंदोबस्त व अवेळच्या ड्युटीमुळे पोलिसांना मानसिक तणाव व विविध व्याधींना सामोरे जावे लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन व फिटनेस राहण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक आयुक्तालय/अधीक्षक व अन्य विविध शाखांच्या कार्यक्षेत्रात लोणावळ्यातील केवलधाम संस्थेशी करार करण्यात आला. त्यांच्याकडील तज्ज्ञ प्रशिक्षकाची नियुक्ती करून पोलिसांना योगासनाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. पोलीस अधिकारी व अंमलदारांना सोयीचे ठरणाऱ्या वेळेत रोज सकाळी ३०-४५ मिनिटे योगासने शिकविण्यात येत आहेत. त्याला बहुतांश पोलीस घटकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता २१ जूनला देशभरात साजरा केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने सर्व घटकांमध्ये योग शिबिराचे आयोजन करण्याची सूचना घटकप्रमुखांना करण्यात आलेली आहे. ज्या आयुक्तालय/अधीक्षक कार्यालयात योग प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही तेथील घटकप्रमुखांनी तातडीने केवलधाम संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून २१ जूनला योग शिबिराचे आयोजन करावे, अशी सूचना पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी केली आहे. योगदिनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा अहवाल घटकप्रमुखांनी २८ जूनपर्यंत पोलीस मुख्यालयात पाठवावयाचा आहे.