खाकी वर्दीतील समुपदेशकाने केला चमत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2017 04:05 AM2017-01-17T04:05:51+5:302017-01-17T04:05:51+5:30

लहानपणीच त्याचे आईवडिलांचे छत्र हरवले. तो १३ ते १४ वर्षांचा होईपर्यंत आजीने त्याचा सांभाळ केला

Khaki uniform counselor did wonders | खाकी वर्दीतील समुपदेशकाने केला चमत्कार

खाकी वर्दीतील समुपदेशकाने केला चमत्कार

Next

जितेंद्र कालेकर,

ठाणे- लहानपणीच त्याचे आईवडिलांचे छत्र हरवले. तो १३ ते १४ वर्षांचा होईपर्यंत आजीने त्याचा सांभाळ केला. मात्र, अचानक कुसंगतीमुळे तो व्यसनाधीन झाला. व्यसनांची पूर्तता करण्यासाठी आजीलाच शिवीगाळ आणि मारहाण करू लागला. आपल्या नातवाची हीच तक्रार घेऊन आजीने पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्याला आपला खाक्या न दाखवता त्याचे कौन्सिलिंग केले. पोलिसांनी आपल्या डोळ्यांत अंजन घातले असून आता आपण सन्मार्गाने आणि सन्मानाने जगणार असल्याची ग्वाही त्याने पोलिसांना दिली आहे.
किसननगरमध्ये राहणारा राहुल पवार (नाव बदलले आहे) हा आपल्या आजीकडे वाढला. तो तीन वर्षांचा असतानाच त्याच्या आईचे निधन झाले, तर वडिलांनी दुसरे लग्न केले. लहानपणापासूनच आईवडिलांच्या प्रेमाला पारखा झालेल्या राहुलचा त्याच्या वडिलांच्या आईने सांभाळ केला. त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर तो अकरावीत गेला. कॉलेजला काही मित्रांच्या संगतीने तो व्यसनाच्याही आहारी गेला. कॉलेजची हवा लागून बिघडलेला हा छोकरा आजीला शिवीगाळ आणि मारहाणही करू लागला. सिगारेट किंवा तंबाखूसाठी पैसे मागत असल्याचे समजताच आजीने त्याला पैसे देणे बंद केले. त्यामुळे तो कोपरीतील त्याच्या आत्याकडे वरचेवर जाऊ लागला. पण, तिथे त्याची पैशांची मागणी पूर्ण न झाल्याने पुन्हा तो किसननगरला येऊन आजीलाच त्रास देऊ लागला. अखेर, शनिवारी (१४ जानेवारी रोजी) नातवाची तक्रार घेऊन आजीने श्रीनगर पोलीस ठाणे गाठले. या अल्पवयीन मुलाविरुद्ध तक्रार नोंदवून त्याला पोलिसी खाक्या दाखवला, तर या मुलाच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होईल. याला असाच सोडून दिले, तर कदाचित आजीच्या जीवाचे बरेवाईट होण्याची भीतीहोती. पोलिसांनी आजीला घरी पाठवून वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.सी. कारकर यांनी त्याला व्यसन आणि कुसंगतीमुळे कसे वाईट परिणाम होऊ शकतात, या वास्तवाची जाणीव करून दिली. आईवडील बनून सांभाळ करणाऱ्या आजीचे महत्त्व कारकर यांनी दिवसभर पटवून दिले. मुलाने चांगल्या वर्तनाची दिलेली हमी व आत्याला त्याच्यावर लक्ष ठेवण्याची सूचना करून कारकर यांनी त्याला घरी पाठवले. पुढील किमान आठवडाभर दररोज पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यास सांगितले असून त्याच्या वागण्यातील बदलावरही नजर ठेवली जाणार असल्याचे कारकर यांनी स्पष्ट केले.
>आणखी चौघांमध्ये अशीच केली सुधारणा
किसननगरमधील आणखी चार तरुणांचे पोलिसांनी अशाच प्रकारे मतपरिवर्तन केले आहे. अंधेरीला चांगल्या पगारावर नोकरीला असणाऱ्या या तरुणांना नशा येणाऱ्या व्हाइटनर सेवनाचे व्यसन लागले होते. याची तक्रार पालकांनीच पोलिसांकडे केल्यानंतर कारकर यांच्या पथकाने त्यांचे मतपरिवर्तन करून त्यांना पोलीस ठाण्यात रोज हजेरी लावण्यास भाग पाडले. त्यांच्यातही सुधारणा होऊन ते निर्व्यसनी झाल्यामुळे त्यांच्या पालकांनीही पोलिसांचे आभार मानले आहेत.

Web Title: Khaki uniform counselor did wonders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.