खांदेरी पाणबुडीचे जलावतरण!
By admin | Published: January 13, 2017 04:53 AM2017-01-13T04:53:05+5:302017-01-13T04:53:05+5:30
फ्रान्सच्या सहकार्याने माझगाव गोदीत सहा स्कॉर्पियन पाणबुड्या बांधणीचे काम सुरू आहे.
मुंबई : फ्रान्सच्या सहकार्याने माझगाव गोदीत सहा स्कॉर्पियन पाणबुड्या बांधणीचे काम सुरू आहे. यातील खांदेरी या दुसऱ्या स्वदेशी पाणबुडीचे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत जलावतरण झाले. जलदुर्ग खांदेरी आणि उंदेरी यांच्यापैकी खांदेरी दुर्गावरून या पाणबुडीस नाव देण्यात आले आहे. या वेळी नौदल प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जलावतरणानंतर खांदेरी पाणबुडी किमान वर्षभर विविध सागरी आणि सामरिक चाचण्यांना सामोरी जाईल.
स्कॉर्पियन वर्गातील या पाणबुड्यांमध्ये उच्च दर्जाची स्टिल्थ प्रणाली वापरली गेली आहे. त्यामुळे शत्रुपक्षाला चकवा देत सागरी मोहिमा फत्ते करण्याची क्षमता या पाणबुड्यांमध्ये आहे.
खोल समुद्रातून तसेच समुद्रावरुन टॉरपॅडो, क्षेपणास्त्रे, युद्धनौकाविरोधी क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता या पाणबुड्यांमध्ये आहे. सर्व प्रकारच्या सागरी मोहिमांमध्ये उपयोगी पडतील अशी अत्याधुनिक प्रणाली या पाणबुड्यांमध्ये उभारण्यात येणार आहे.
समुद्रात सुरुंग पेरणे, माहिती गोळा करणे, टेहळणीपासून युद्धनौका व पाणबुडीविरोधी मोहिमा हाताळण्याची क्षमता या पाणबुड्यांमध्ये आहे.