खा.उदयनराजेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 11:39 AM2017-07-19T11:39:10+5:302017-07-19T11:39:10+5:30
राष्ट्रवादीचे खासदार उदयराजे भोसलेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19- राष्ट्रवादीचे खासदार उदयराजे भोसलेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. उदयराजे भोसलेंचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावला आहे. त्यामुळेच उदयनराजेंना आता अटक होण्याची शक्यता आहे. उदयनराजे भोसले यांच्यावर खंडणी आणि मारहाणीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोणंदमधील सोना अलाईन कंपनीच्या मालकाने त्यांच्याविरोधात तक्रार केली होती. यावरून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता पण तो अर्ज बुधवारी मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावला आहे. कायदा सगळ्यांसाठीच सारखा आहे, वेळ आलीच तर त्यांना अटक केली जाईल असं कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी याआधी ठणकावून सांगितलं होतं.मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयानंतर उदयराजे भोसलेंच्या भोवती अटकेची टांगली तलवार असणार आहे.
खंडणी आणि मारहाणीच्या आरोपाखाली उदयनराजे यांच्यावर सोना अलाईन कंपनीच्या मालकाने केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्जही फेटाळला आहे. तर या प्रकरणातील 9 आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण-
साताऱ्यातल्या लोणंदमधे सोना अलाईज नावाची एक कंपनी आहे. या कंपनीत उदयराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली असलेली एक माथाडी कामगार संघटना आहे. तर दुसऱ्या संघटनेचे नेतृत्त्व रामराजे निंबाळकर करतात. ही कंपनी रामराजे निंबाळकर यांच्या कामगार संघटनेला झुकते माप देते असा आरोप उदयनराजे यांनी केला. त्यानंतर 18 फेब्रुवारीला उदयनराजेंनी कंपनीचे अधिकारी राजकुमार जैन यांना सातारा विश्रामगृहात बोलावून घेतलं. तेथे पोहोचल्यानंतर उदयनराजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राजकुमार जैन यांना मारहाण केली आणि काही ऐवज काढून घेतला, अशी तक्रार जैन यांनी सातारा पोलीस स्टेशनला दिली त्यानंतर उदयनराजे आणि सहका-यांवर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.