Ravi Rana on Illegal Construction: अनधिकृत बांधकाम! रवी राणांनी हात झटकले; म्हणाले बिल्डर, महापौरांवर कारवाई करा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 03:26 PM2022-05-21T15:26:27+5:302022-05-21T15:27:17+5:30
इमारतीच्या आठव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये झालेले अनधिकृत बांधकाम आपण केलेले नाही, असेच त्यांनी याद्वारे म्हटले आहे.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचं मुंबईतील खारमधील फ्लॅटमध्ये नियमांचा भंग झाल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांना आढळून आलं आहे. यामुळे राणा दाम्पत्याला महापालिकेने पुन्हा नोटीस पाठविली असून अनधिकृत बांधकाम ७ ते १५ दिवसांत पाडा, अन्यथा महापालिकेला कारवाई करावी लागेल, असा अल्टिमेटम देण्यात आला आहे. यावर रवी राणा यांच्याकडून प्रतिक्रिया आली आहे.
इमारतीच्या आठव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये झालेले अनधिकृत बांधकाम आपण केलेले नाही, असेच त्यांनी याद्वारे म्हटले आहे. नोटीशीला मी कायदेशीर उत्तर देणार आहे. ज्या बिल्डरकडून मी घर घेतले त्या बिल्डरला सर्व परवानग्या मुंबई महापालिकेने दिल्या आहेत. बीएमसी महापौरांनी परवानग्या दिल्या आहेत. वर्षानुवर्षे शिवसेनेचा महापौर आहे. तिथे तुमचेच अधिकारी आहेत. यामुळे संबंधित बिल्डर आणि महापौरांवर कारवाई करावी, अशी मागणी करत राणा यांनी अनधिकृत बांधकामावरून हात झटकले आहेत.
तसेच जर काही चुकीचं असेल बिल्डिंग बांधकामाला परवानगी दिलीच कशी? या भागातील सर्व बिल्डिंग एकाच बिल्डरने बांधल्या आहेत. त्या सर्व बिल्डींगची तपासणी व्हावी. यात जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी राणा यांनी केली आहे.
संजय राऊतांसोबत दौरा ही महाराष्ट्राची संस्कृती
दोन दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा, रवी राणा, शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत हे एकत्र लडाख दौऱ्यावर गेले होते. तिथे ते एकमेकांशी खेळीमेळीत चर्चा करताना दिसले. हे फोटो राज्यात व्हायरल झाले होते. दोन आठवड्यांपूर्वीपासूनचे सुरु असलेले घमासान आणि अचानक या दौऱ्यात एकत्र फिरणे, जेवणे आदीचे फोटो पाहून लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. यावर रवी राणा यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शिवसेनेची संस्कृती द्वेष पसरवणे आहे. महाराष्ट्राबाहेर कोणी भेटले तरी मराठी माणूस म्हणून भेटणं ही आमची संस्कृती आहे. लेहचा दौरा हा सरकारी होता. त्यात कोणीही राजकारण आणू नये, असे राणा म्हणाले.
काही दिवसांपूर्वी राणा दाम्पत्याच्या खारमधील घराची पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. त्यानंतर पालिकेनं आज राणा दाम्पत्याला महापालिका कायद्याच्या कलम ३५१ (१ए) च्या अंतर्गत कारणे दाखवा नोटीस पाठवली. त्यानंतर राणा दाम्पत्य ठोस कारण दाखवण्यात अपयशी ठरल्यास, त्यांच्या घरातील अवैध बांधकामावर कारवाई करण्यात येईल, असं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं.