खार पोलिसांची आरोपीला मदत

By admin | Published: January 23, 2017 04:12 AM2017-01-23T04:12:41+5:302017-01-23T04:12:41+5:30

एका गारमेंटच्या दुकानाचा बळजबरीने कब्जा घेऊन त्यातील सुमारे ७ कोटींच्या साहित्याची परस्पर विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Khar police help the accused | खार पोलिसांची आरोपीला मदत

खार पोलिसांची आरोपीला मदत

Next

जमीर काझी / मुंबई
एका गारमेंटच्या दुकानाचा बळजबरीने कब्जा घेऊन त्यातील सुमारे ७ कोटींच्या साहित्याची परस्पर विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याऐवजी खार पोलिसांनी संशयित आरोपींना तब्बल ५ महिन्यांपासून पूर्ण मोकळीक दिल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. इतकेच नव्हे, तर या प्रकरणातील संशयित हे अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेल्याने काहीही कार्यवाही केलेली नाही, अशी चक्क कबुली माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्जावर दिलेली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश धुडकावून तपास अधिकारी संशयिताला मदत करीत असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर सहायक आयुक्त व पोलीस उपायुक्तांनीही या प्रकरणातील गांभीर्य समजून न घेता तपास अधिकाऱ्याला पाठीशी घातल्याने पोलीस आयुक्त डी. डी. पडसलगीकर यांनी या प्रकरणात लक्ष घालून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदाराकडून करण्यात येत आहे.
चेंबूर येथील रमेश पटेल यांचे खार पश्चिम येथील एस. व्ही. रोडवर कृष्णा वर्ल्ड फॅशन या नावाचे रेडिमेड गारमेंटचे दुकान आहे. पटेल यांची जोगेश्वरीतील सदाशिव पांडे याच्याशी अडीच वर्षांपासून ओळख आहे. व्यवसायासाठी त्यांनी फेबु्रवारी २०१३मध्ये ५२ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यापैकी ३५ कोटी ४० लाख मुद्दल व २ लाख ८० हजार परत केले. मात्र उर्वरित रक्कम वेळेत न दिल्याने त्यांच्यात वाद झाले. पांडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पटेल व त्याचे ३ भाऊ व कामगारांसह १० जणांनी आपल्यावर खुनी हल्ला केल्याचा आरोप करीत २६ आॅक्टोबर २०१३ रोजी खार पोलिसांकडून अटक करविली. ते आॅर्थर रोड जेलमध्ये असताना त्यांच्या रेडिमेंट दुकानाचा बळजबरीने ताबा घेतला. त्याबाबत खार पोलिसांनी स्वतंत्रपणे पटेल यांच्या तक्रारीनुसार पांडे व त्यांच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला.
त्यानंतर काही दिवसांनी पटेल यांना त्यांच्या दुकानातील सर्व फर्निचर, तयार कपडे व अन्य ऐवज असा सुमारे ७ कोटी रुपयांचे साहित्य पांडे यांनी गायब केल्याचे समजल्यानंतर त्याबाबत त्यांनी १४ डिसेंबरला गुन्हा दाखल करण्यासाठी खार पोलिसांकडे तक्रार केली.
मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल न करता केवळ आश्वासनावर बोळवण केली. अखेर पटेल यांनी याबाबत पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीबाबत आरटीआय अंतर्गंत गेल्या वर्षी २७ नोव्हेंबरला माहिती विचारली असता, तपास अधिकारी सहायक निरीक्षक नीलेश भुजबळ यांच्या अहवालानुसार वांद्रे विभागाचे सहायक आयुक्त संजय कदम यांनी चक्क कळविले की, सदर तक्रारीबाबत पाडे व त्यांचे सहकारी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी गेलेले आहेत. त्यामुळे काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
दखलपात्र गुन्हा त्वरित दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना दिलेले आहेत. मात्र या ठिकाणी तब्बल ४ महिने काहीच कार्यवाही न झाल्याने पटेल यांनी या उत्तराबाबत प्रथम अपील अधिकाऱ्यांकडे दाद मागितली. त्यानुसार परिमंडळ-९चे उपायुक्त सत्यनारायण यांच्याकडे २७ डिसेंबरला सुनावणी झाली. त्यांनी चौकशी करण्याचे तोंडी आश्वासन दिले तरी प्रत्यक्षात या प्रकरणी जनमाहिती अधिकाऱ्याने दिलेली माहिती योग्य असल्याचे लेखी पत्राद्वारे कळवत पोलिसांना पाठीशी घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही.

Web Title: Khar police help the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.