खोरला पाणी मिळाले; पण जलपूजनापुरते
By admin | Published: September 22, 2016 02:06 AM2016-09-22T02:06:16+5:302016-09-22T02:06:16+5:30
अनेक दिवसांपासूनच्या प्रतीक्षेत असलेल्या खोर (ता. दौंड) गावाला जनाई-शिरसाई योजनेचे पाणी मिळाले
खोर : अनेक दिवसांपासूनच्या प्रतीक्षेत असलेल्या खोर (ता. दौंड) गावाला जनाई-शिरसाई योजनेचे पाणी मिळाले; पण फक्त जलपूजनापुरतेच. हे पाणी आल्याने येथील शेतकरी सुखावला होता; मात्र हा आनंद पाण्याबरोबर वाहून गेला. येथील फडतरेवस्ती तलावात रविवारी पाणी पोहोचले आणि मंगळवारी (दि. २0) पाणी बंद करण्यात आले.
खोर परिसरातील शेतकऱ्यांनी फडतरेवस्ती तलाव हा पूर्ण क्षमतेने भरून देण्याची मागणी केली होती. तलाव पूर्ण भरून सांडव्यातून पाणी जर ओढ्याला गेले नाही, तर पूर्व भागामधील शेतकऱ्यांना काहीच फायदा या तलावापासून होणार नव्हता, तसेच झाले आहे. पाणी फक्त जलपूजनापुरतेच सोडले का, असा सवाल शेतकरी करीत आहेत.
आता पुरंदर जलसिंचन उपसा योजनेचे पाणी हे डोंबेवाडी पाझर तलावात कधी सोडतात या कडे सर्वांचे लक्ष लागल आहे. हा तरी तलाव पूर्ण क्षमतेने भरून द्या, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहे. तसेच, आणखी वाढीव
पाणी फडतरेवस्ती तलावात सोडण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. याबाबत जनाई-शिरसाई जलसिंचन उपसायोजनेचे व्यवस्थापन विभागाचे कनिष्ठ अभियंता अशोक कुवर म्हणाले, फडतरेवस्ती तलावात दोन दिवस पाणी सोडण्यात आले आहे. पुरंदर व बारामती तालुक्यातील बरीच गावे ही पाणी सोडण्याची वाट पाहत आहेत. राजुरी, बोरकरवाडी, आंबी, पांडेश्वर या गावांनादेखील पाणी देणे गरजेचे आहे. यांना पाणी दिले नाही तर लगेचच पाणी चोरी करणे, दमदाटी करणे असे प्रकार घडतात. त्यामुळे सर्व गावांना समान पाणी सोडण्यात आले असून, नंतर खोरच्या पद्मावती तलावात पाणी सोडण्यात येईल. सध्या लिकेजद्वारे २ क्युसेक्स पाणी पद्मावती तलावात चालू असल्याचे कुवर यांनी सांगितले आहे.(वार्ताहर)
>जलपूजन करायला नको होते
आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्यातून जनाई-शिरसाई योजनेचे पाणी सोडण्यात आले; मात्र लगेचच जलपूजन करायला नको होते असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कारण, दरवर्षीची गत आहे की जलपूजन झाले की अधिकारी म्हणतात पाणी पोहोचले आहे. खोरला आता पाणी बंद केले तरी चालेल, अशीच समजूत योजना अधिकाऱ्यांची झाली आहे.
>टँकरदेखील झाला बंद
फडतरेवस्ती तलाव हा पूर्ण क्षमतेने भरून मिळावा, अशी माफक अपेक्षा या भागातील जनतेची होती; मात्र जनतेच्या सर्वच अपेक्षा फोल ठरल्या.
>एकीकडे सिंचन योजनेचे पाणी बंद करण्यात आले, तर दुसरीकडे गावाला पाणीपुरवठा करणारे टँकरदेखील बंद झाल्याने खोर गाव हे अधीकच पाण्याच्या अडचणीत सापडले आहे.