गिरीश महाजनांच्या नेतृत्वात काम करण्यास खडसे तयार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 06:09 AM2018-06-30T06:09:25+5:302018-06-30T06:09:28+5:30
युतीसाठी भाजपा हतबल का?; खडसे यांचा सवाल
जळगाव : सध्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे जिल्ह्याचे नेते आहेत. मी नेता नाही. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास मी तयार आहे. मात्र हे करीत असताना वाईट प्रवृत्तींना साथ देणार नाही, असा इशारा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिला.
महापालिका निवडणुकीबाबत शुक्रवारी संध्याकाळी त्यांनी निवासस्थानी पत्रकारांसोबत वार्तालाप केला. ते म्हणाले की, निवडणुकीत भाजपा व खान्देश विकास आघाडी (खाविआ) यांच्या युतीबाबत अधिकृत कोणतीही घोषणा झालेली नाही. जळगावात कोणतेही पाठबळ नसताना यापूर्वी आपण ३३ नगरसेवक निवडून आणले आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष विजयी केला आहे. त्यावेळी फक्त एकट्या नाथाभाऊने जळगावात पक्ष वाढविला. निवडणुका सुरू होऊ द्या. माझ्या हातात भरपूर काही आहे. ‘आगे आगे देखो होता है क्या...’, असेही खडसे म्हणाले.
भाजपा दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्तेत आहे. आमच्याकडे मंत्री आहेत. पक्षाची ताकद आहे. मात्र तरी देखील भाजपा खाविआसोबत युती करण्यासाठी का तयार होत आहे, असा प्रश्नही त्यांनी केला.
अंजली दमानिया यांच्या विरोधात दाखल खटल्याचा तपास पुन्हा पोलीस निरीक्षक कडलक यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस अधीक्षकांचे वर्तन हे नियमबाह्य आहे. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी या मागणीचा अर्ज आपण औरंगाबाद खंडपीठात दाखल केल्याचे खडसे यांनी सांगितले.