खारघर टोल नाक्यावरून संताप
By admin | Published: January 7, 2015 01:59 AM2015-01-07T01:59:46+5:302015-01-07T01:59:46+5:30
खारघर टोलनाक्याविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पहाटे टोलनाक्यावरील तीन खिडक्यांची तोडफोड केली.
वैभव गायकर - नवी मुंबई
खारघर टोलनाक्याविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पहाटे टोलनाक्यावरील तीन खिडक्यांची तोडफोड केली. नियोजनामधील त्रुटींमुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. दोन किलोमीटरच्या रांगा लागल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
सायन - पनवेल महामार्गावरील खारघर टोलनाका उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शासनाने सोमवारी मध्यरात्री १२ वाजता सुरू केला आहे. मंगळवारी पहाटे मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली. लोखंडी सळई व काठ्यांनी केबिन तोडल्या. टोल बंद झालाच पाहिजे, अशा घोषणा आंदोलकांनी देवून तेथून पळ काढला. आंदोलकांविरोधात कळंबोली पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. टोल वसुलीमधून खारघर, कोपरा, कळंबोली, कामोठे व पनवेलमधील रहिवाशांना सूट देण्यात येणार आहे.
गर्दीमुळे प्रवाशांना अर्धा तास रखडावे लागले. सायंकाळी महामार्गावर चक्का जाम झाला होता. अखेर वाहतूक पोलिसांनी सूचना दिल्यानंतर काही वाहने टोल न घेताच सोडण्यात आले. ‘रुंदीकरणाचे ९८ टक्के काम पूर्ण झाल्यामुळे १५ दिवसांमध्ये टोल सुरू करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे टोल सुरू करण्यात आलेला आहे. टोलमधून खारघर, कळंबोली, कामोठे, कोपरा व पनवेलमधील रहिवाशांना सूट दिली असून तळोजा एमआयडीसीमधून येणाऱ्या वाहनांही सूट दिली आहे. अजून याविषयी कोणाला सूट देणे आवश्यक आहे का याचा विचार केला जाईल, असे पणनमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
१पनवेलकडे जात असताना तळोजा लिंक रोड जवळील पुरुषार्थ पेट्रोलपंपासमोरील मार्गावर काँक्रिटीकरणाचे काम अर्धवट असल्यामुळे वाहनचालकांना रस्त्यांतून मार्ग काढत जावे लागत आहे.
२कोपरा खाडी जवळील सुरक्षा कठड्याचे काम देखिल अर्धवटच आहे. हिच अवस्था कळंबोली , कामोठे उडडाणपुला जवळील रस्त्यांलगत असल्यामुळे वाहतुक कोंडीत वाढ होत आहे. पनवेलच्या दिशेने सायन कडे येणा-या खारघर , नेरुळ, सानपाडा याठिकाणी देखिल हिच अवस्था आहे.
३विशेष म्हणजे जेवढीही अर्धवट कामे ठेवण्यात आली आहेत ती महत्वाच्या शहरांच्या प्रवेशद्वाराजवळ आहेत त्यामुळे खारघर, कामोठे, कळंबोली, कोपरा गाव , नेरुळ, सानपाडा या शहरांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी याठिकाणच्या खड्ड्यांना सामोरे जावे लागत आहे
सूट देताना शहरी भागाची माहिती नव्हती
खारघर टोलमधून पाच गावांना सूट देताना या गावांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असल्याचा विसर शासनास पडला आहे. मूळ गावातील नागरिकांना सूट मिळणार असून इतरांना टोल भरावा लागणार आहे. वाहतूक पोलिसांच्या पत्रकार परिषदेत एसपीटीपीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मौन बाळगले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश आगवणे यांनी सांगितले की, गावांना सूट मिळाली व शहरी भागास नाही यामुळे घोळ झाला आहे. याविषयी लवकरच अंतिम निर्णय होईल तोपर्यंत खारघर ते पनवेल परिसरातील सर्व रहिवाशांना सूट देण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रशांत ठाकूर यांच्या भूमिकेकडे लक्ष
टोल रद्द करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी निवडणुकीपूर्वी आमदारकीचा राजीनामा दिला होता. परंतु आता टोल फक्त पाच गावातील नागरिकांना माफ केल्यामुळे ते पुन्हा राजीनामा देऊन आंदोलन करणार का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. याविषयी ठाकूर यांनी सांगितले की, खारघर ते पनवेलपर्यंतच्या सर्व नागरिकांना सूट मिळावी अशी आमची मागणी आहे.
राष्ट्रवादीचाही विरोध
राष्ट्रवादी काँगे्रसचे शहर अध्यक्ष सुनील घरत यांनीही टोलला विरोध केला आहे. पनवेलसह, कर्जत, खालापूरमधील नयना क्षेत्रातील रहिवाशांना टोलमधून सूट मिळावी. जर टोलमधून या परिसरातील रहिवाशांना सूट दिली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
मनसेने या टोलनाक्याची तोडफोड केली असून आमचे हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हा चिटनीस केसरीनाथ पाटील यांनी दिली. मनसेचे जिल्हा चिटणीस केसरीनाथ पाटील यांनी पहिल्याच दिवशी टोल फोडणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. ज्यांनी टोल फोडला त्यांचा आम्हाला अभिमान वाटत आहे. आमचा टोलला विरोध असून युती शासनाचा आम्ही निषेध करत आहोत.
शेकापचे ८ जानेवारीला आंदोलन
शेतकरी कामगार पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ८ जानेवारीला टोलनाक्यावर तीव्र आंदोलन केले जाणार आहे. निवडणुकीपूर्वी प्रशांत ठाकूर यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. तेव्हा नितीन गडकरी यांनी टोलचा जनक मीच आहे, तो मीच बंद करणार अशी घोषणा केली होती. आता तो बंद करूनच दाखवा, असे आव्हान शेकापने दिले आहे.