कचऱ्याच्या गंभीर समस्येवरून खारघरवासी रस्त्यावर उतरणार!
By admin | Published: September 24, 2016 02:39 AM2016-09-24T02:39:13+5:302016-09-24T02:39:13+5:30
सिडकोच्या नोडमध्ये विशेषत: खारघर नोडमध्ये सध्या डेंग्यू, मलेरियासारख्या साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे.
पनवेल : सिडकोच्या नोडमध्ये विशेषत: खारघर नोडमध्ये सध्या डेंग्यू, मलेरियासारख्या साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. शेकडो संशयित रुग्ण विविध खासगी रु ग्णालयात डेंग्यू व मलेरियासारख्या आजारांवर उपचार घेत आहेत.
शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग पसरले आहेत. याविरोधात नागरिक रस्त्यावर उतरणार आहेत. खारघरचा राजा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने यासंदर्भात रविवार, २५ सप्टेंबर रोजी एका सभेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी रहिवाशांच्या तक्रारींवर चर्चा करून सिडकोविरोधात आंदोलन छेडले जाणार आहे.
खारघरसह सिडकोच्या इतर नोडमध्ये कचरा उचलण्याचे काम बीव्हीजी ही खासगी कंपनी करते. मात्र कर्मचाऱ्यांची निदर्शने, कचरा उचलण्यात असलेला अनियमतिपणा यामुळे शहरात कचऱ्याची समस्या बिकट झाली आहे. काही विभागात दोन ते तीन दिवस कचरा उचलला जात नसल्याने दुर्गंधी पसरत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सिडकोचा आरोग्य विभाग साथीच्या आजारावर लगाम घालण्यासाठी जनजागृती, धुरीकरणावर भर देत आहे. मात्र कचऱ्याचे योग्य नियोजन होत नसल्याने साथीचे आजार पसरत असल्याचे भाजपा पनवेल ओबीसी सेलचे अध्यक्ष विजय पाटील यांचे सांगितले.
खारघरमधील रहिवाशांची सभा आयोजित करून कचरा, भटक्या कुत्र्यांचा प्रादुर्भाव, शहरातील खड्डे आदी विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. यासंदर्भात सिडकोला निवेदन देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. शहरातील सेक्टर १९ मधील साई सदन इमारतीसमोरील कचरा उचलण्यासाठी अनेकदा सांगण्यात आले असले तरी सिडकोकडून दखल घेतली जात नसल्याचे रहिवासी नलिनी कुलकर्णी यांनी सांगितले. या रहिवासी संकुलातील अनेक जण साथीच्या आजारांनी त्रस्त आहेत. मात्र तक्रार करूनही सिडकोकडून चालढकल करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
>वेळच्यावेळी कचरा उचलला जात नसल्याने परिसरात साथीचे आजार वाढले आहेत.