खरिपाचे अनुदान मुख्यमंत्री निधीलाच दान!
By admin | Published: September 10, 2015 02:42 AM2015-09-10T02:42:53+5:302015-09-10T02:42:53+5:30
शासनाने खरीप हंगामासाठी देऊ केलेले मागच्या वर्षीचे अनुदान यावर्षीचा हंगाम गेल्यानंतरही पदरी पडलेले नाही. यासाठी तहसील कार्यालयात हेलपाटे मारणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू
- विकास राऊत, औरंगाबाद
शासनाने खरीप हंगामासाठी देऊ केलेले मागच्या वर्षीचे अनुदान यावर्षीचा हंगाम गेल्यानंतरही पदरी पडलेले नाही. यासाठी तहसील कार्यालयात हेलपाटे मारणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पत्नीने हे देऊ केलेले अनुदान
मुख्यमंत्री निधीलाच दान दिले
आहे.
शिरेगाव येथील आप्पासाहेब कऱ्हाळे असे त्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. मे महिन्यापासून साडेचार हजार रुपयांसाठी ते तहसील कार्यालयात खेटा घालत होते. मात्र, त्यांना प्रत्येक वेळी ते रिकाम्या हाताने परतले. आजारपण आणि प्रशासनाकडून सुरू असलेल्या पिळवणुकीमुळे थकलेले कऱ्हाळे यांनी १३ आॅगस्ट रोजी जगाचा निरोप
घेतला.
आता हे अनुदान कऱ्हाळे यांना देण्यासाठी गंगापूर तहसीलने युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. पतीच्या निधनानंतर प्रशासनाने देऊ केलेले दुष्काळी अनुदान अप्पासाहेब यांच्या पत्नी मंदाबाई कऱ्हाळे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला दान करण्याचा अर्ज गंगापूरचे तहसीलदार दिनेश झांपले यांना दिला आहे. पती हयात असताना अनुदान मिळाले नाही. मग त्यांच्या पश्चात ते अनुदान काय करायचे असा
सवाल मंदाबाई यांनी अर्जातून केला आहे.
मे महिन्यात दिले होते पत्र...
कऱ्हाळे यांनी मेमध्ये गंगापूर तहसीलदारांना अनुदान बँक खात्यात जमा होत नसल्याबाबत निवेदन दिले होते. त्यावरून आयसीआयसीआय या बँकेला नोटीस काढून तहसीलदाराने अनुदान तातडीने वाटप करण्यास सांगितले. त्यानंतर साडेतीन महिने उलटले. मात्र कऱ्हाळे यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले नव्हते. बँकेला जानेवारीमध्ये अनुदानाची रक्कम देण्यात आली होती; परंतु यादीमध्ये कऱ्हाळे यांचे नाव नसल्यामुळे अनुदान जमा झाले नसल्याचे बँकेने तहसीलदारांना कळविले होते.
या प्रकरणाची माहिती घेतली आहे. तलाठी आर. बी. वंजारे यांच्या अहवालात संबंधित शेतकऱ्याचे नाव आले नाही. त्यामुळे अनुदान देण्यात विलंब झाला. याप्रकरणी तलाठ्याला नोटीस बजावली आहे.
- दिनेश झांपले, तहसीलदार, गंगापूर
अनुदानाच्या पहिल्या मंजूर यादीत नाव होते.
दुसऱ्या यादीत नाव नव्हते. वडील गेल्यामुळे ते अनुदान आता मुख्यमंत्री निधीसाठी देऊ केले आहे. परंतु ती रक्कम सहायता निधीत सामावून घेण्याचा निर्णय तहसील कार्यालय घेत नाही.
- दत्ता कऱ्हाळे, आप्पासाहेब यांचा मुलगा