पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात!

By admin | Published: July 6, 2015 03:51 AM2015-07-06T03:51:07+5:302015-07-06T03:51:07+5:30

पावसाने दडी मारल्याने राज्यातील खरीप हंगाम धोक्यात आला असून, सुमारे ८० ते ९० लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या आहेत.

Kharif season hampered kharif season! | पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात!

पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात!

Next

पुणे/अकोला/जळगाव : पावसाने दडी मारल्याने राज्यातील खरीप हंगाम धोक्यात आला असून, सुमारे ८० ते ९० लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या आहेत. येत्या दोन-चार दिवसांत तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. मात्र तरीही पाऊस लांबून दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येईल, असे महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. शिवाय, गरज पडली तर कृत्रिम पाऊस पाडण्याची शासनाची तयारी असल्याचेही ते म्हणाले.
यंदा पावसाने वेळेवर सुरुवात केली, पण त्यानंतर लगेच दडी मारली. राज्यातील १.४० कोटी हेक्टरवरील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा, खान्देशात कापूस हे नगदी पीक जवळपास ४० लाख हेक्टर घेतले जाते; परंतु पाऊस नाही आणि तापमान प्रचंड वाढत असल्याने मराठवाडा, विदर्भातील कापूस पिकाने माना टाकणे सुरू केले आहे. विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रातही तीच अवस्था आहे. चार दिवसांपूर्वी राज्यात ३४% म्हणजेच ४५.७३ लाख हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची पेरणी केली होती. त्यामध्ये १०% वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील ९० लाख हेक्टर क्षेत्र अद्याप नापेर आहे.
औरंगाबादमध्ये कृत्रिम पाऊस
आॅगस्ट महिन्यातच पावसाने ओढ दिली तर कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी आहे. त्यासाठी जागतिकस्तरावर निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यात एका कंपनीची निविदा मंजूरही करण्यात आली आहे. औरंगाबाद केंद्रस्थानी ठेवून आवश्यकता भासल्यास २५० किमी परिघात कृत्रिम पाऊस पाडला जाईल. त्यासाठी रडार व इतर प्राथमिक यंत्रणेची जुळवणी सुरू आहे. तसेच रॉकेटच्या माध्यमातून पाऊस पाडण्याचा प्रस्ताव अन्य कंपनीने दिल्याचे खडसे यांनी सांगितले.

पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पश्चिम महाराष्ट्रातील खरिपातील पिकांवर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना १५ जुलैपर्यंत आपत्कालीन नियोजन देणार आहोत. पावसाची सध्या नितांत गरज आहे, असे अहमदनगरमधील राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे यांनी सांगितले.
----------
मराठवाड्यातील पिके आणखी पाच ते सहा दिवस तग धरतील. त्यानंतर मात्र या पिकांना धोका राहणार आहे. परभणी, उस्मानाबाद व लातूर या भागात पाऊस अत्यंत कमी आहे. त्यासाठी पावसाची नितांत गरज आहे. आपत्कालीन पीक नियोजन तयार केले आहे. - डॉ. बी. वेंकटेस्वोरलू,कुलगुरू, व्हीएनएमके व्ही, परभणी
-----------
पावसाने दडी मारल्याने पेरण्यांवर परिणाम झाला असून, खरीप पिकांना झळ बसण्याचा धोका आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांची रोवणीची कामे पावसाअभावी खोळंबली आहेत.- अनिल बन्सोड, पीक सांख्यिकी अधिकारी, कृषी आयुक्तालय, पुणे
-----------
तीन दिवसांचा ‘ओला’ अंदाज
पुणे येथील वेधशाळेच्या अंदाजानुसार, पुढील ३ दिवसांत कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर गुरुवारी कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Web Title: Kharif season hampered kharif season!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.