अतिवृष्टीने चार लाख हेक्टर जमिनीचा खरीप हंगाम वाया

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 06:05 AM2022-08-03T06:05:31+5:302022-08-03T06:06:09+5:30

कपाशी, सोयाबीनचा पेरणी कालावधी संपला; रब्बी हंगामाची क्षेत्र वाढ

Kharif season of four lakh hectares of land was wasted due to heavy rains | अतिवृष्टीने चार लाख हेक्टर जमिनीचा खरीप हंगाम वाया

अतिवृष्टीने चार लाख हेक्टर जमिनीचा खरीप हंगाम वाया

Next

- गजानन मोहोड
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जुलैमधील संततधार पाऊस, अतिवृष्टीमुळे राज्यातील १० लाख ७० हजार ४१३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मुख्य पीक असणाऱ्या कपाशी व सोयाबीनचा पेरणी कालावधी आता संपला आहे. त्यामुळे किमान चार लाख हेक्टर क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता आहे. बाजरी, सूर्यफूल, तूर पिकाकडे शेतकऱ्यांचा कल नसल्याने हे क्षेत्र आता रब्बीमध्ये परिवर्तीत होण्याची शक्यता आहे.

 जुलै महिन्यात चार वेळा अतिवृष्टी व संततधार पाऊस झाला. पंचनामे सुरू असल्याने बाधित क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पुरामुळे काठालगतची ९,४८५ हेक्टर शेती खरडून गेली. जोरदार पावसाने पेरणी झालेल्या शेतामधील बियाणे दडपले व   खांडण्या पडल्या आहेत. त्यामुळे किमान तीन लाख हेक्टर क्षेत्रात दुबार पेरणी आटोपणे शक्य झाले. उर्वरित चार लाखांवर हेक्टर क्षेत्र आता रिक्त राहील, असे कृषी विभागाने सांगितले.

 सप्टेंबर अखेरपासून हरभऱ्याची पेरणी
खरिपाच्या मुख्य पिकाचा पेरणी कालावधी आता संपला आहे. पर्यायी पीक असणाऱ्या बाजरी, सूर्यफूल, करडई, तूर पिकांकडे शेतकऱ्यांचा फारसा कल नाही. ऑक्टोबर महिन्यापासून रब्बी हरभऱ्याची पेरणी सुरू होणार आहे. त्यामुळे यंदा खरिपाऐवजी रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्रवाढ होण्याची शक्यता आहे.

तंबीनंतरही पंचनाम्याची गती वाढेना
 विभागीय आयुक्तांनी पंचनाम्यासाठी दोन दिवसांचा अवधी क्षेत्रीय यंत्रणेला दिला होता. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील दोन दिवसांच्या आत पंचनामे पूर्ण करण्याचे सांगितले आहे. राज्यात १ ऑगस्टपर्यंत १०.७० लाख बाधित क्षेत्रापैकी फक्त ४,५७,७५१ हेक्टरमधील पंचनामे पूर्ण झाले. ही ४२.७६ टक्केवारी आहे.

खरिपाच्या पेरण्या आटोपल्या. मात्र, जुलै महिन्यातील अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले. याठिकाणी बाजरी, सूर्यफूल, करडई ही पर्यायी पिके आहेत. सप्टेंबर अखेरपासून हरभरा पेरणी सुरू होणार आहे.
- केशवराव मुळे,
कृषी सहसंचालक

Web Title: Kharif season of four lakh hectares of land was wasted due to heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस