राज्यात खरीप हंगाम धोक्यात, केवळ २४ टक्के क्षेत्रावर पेरण्या; दमदार पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 05:48 AM2019-07-11T05:48:05+5:302019-07-11T05:48:09+5:30
रूपेश उत्तरवार । लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : कोकणासह मुंबईत झालेली अतिवृष्टी आणि पुणे, कोल्हापूर, नाशिकचा काही भाग वगळता ...
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोकणासह मुंबईत झालेली अतिवृष्टी आणि पुणे, कोल्हापूर, नाशिकचा काही भाग वगळता राज्याला दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. जुलै मध्यावर आला तरी पुरेसा पाऊसच नसल्याने राज्यातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. आजअखेर केवळ २४ टक्के क्षेत्रावरच खरीपाच्या पेरण्या झाल्याने पाऊस कधी पडणार आणि पेरणी कधी आटोपणार, याचीच चिंता शेतकऱ्यांना आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील ७१ तालुक्यांची स्थिती पुरेशा पावसाअभावी चिंताजनक झाली आहे. या ठिकाणी सरासरी २५ ते ५० टक्केच पावसाची नोंद झाली. त्यामुळे पेरण्या रखडल्या आहेत.
राज्यात एक कोटी ४९ लाख हेक्टर क्षेत्र खरिपाच्या लागवडीखाली येते. ५ जुलैपर्यंत ३५ लाख ६७ हजार ९५६ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक पेरणी यवतमाळ जिल्ह्यात झाल्याची नोंद कृषी विभागाने केली आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यात स्थिती चिंताजनक आहे. अकोल्यात केवळ दोन टक्के, बुलडाणा ३१, वाशिम ७, अमरावती १४, वर्धा ३५, नागपूर ३२, भंडारा २, चंद्रपूर २५, गडचिरोली ४ व गोंदियात केवळ १टक्का क्षेत्रावरच पेरण्या झाल्या. दुष्काळाने अगोदरच खचलेल्या मराठवाड्यातील स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. लातूर ९ टक्के, उसमानाबाद १२, नांदेड २५, परभणी ३१ आणि हिंगोलीत फक्त ११ टक्के पेरण्या झाल्या आहेत. पेरणीच्या निम्मे क्षेत्र कपाशीचे आहे. १९ लाख १७ हजार ३५८ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे.
महसूल विभागनिहाय पेरणी क्षेत्र
सर्वात कमी पेरणी कोकणात दोन टक्के झाली. नाशिक विभाग २७, पुणे विभाग ४, कोल्हापूर २४, औरंगाबाद ३३, लातूर १९, अमरावती ३० तर नागपूर विभागात २२ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत.
कृत्रिम पावसासाठी ढगच नाहीत
राज्यातील काही भागात पावसाची स्थिती विदारक आहे. अशा भागावर कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. मात्र आवश्यक ढग या ठिकाणावरून जात नाहीत. पूरक परिस्थिती तयार होताच कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार आहे. - डॉ.अनिल बोंडे, कृषिमंत्री