खरीपाच्या पेरण्या शंभर टक्के पूर्ण
By Admin | Published: August 18, 2016 03:12 AM2016-08-18T03:12:54+5:302016-08-18T03:12:54+5:30
यंदा चांगला पाऊस पडल्याने तीन वर्षांनंतर प्रथमच शंभर टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. पावसाने चांगली साथ दिल्यास चांगले
पुणे : यंदा चांगला पाऊस पडल्याने तीन वर्षांनंतर प्रथमच शंभर टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. पावसाने चांगली साथ दिल्यास चांगले उत्पन्न मिळण्याच्या आशा उंचवल्या आहेत.
राज्यात खरीपाचे एकूण १३९.६४ लाख हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यंत तब्बल १४१.२० लाख हेक्टर (१०१ टक्के) क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. जून अखेरपर्यंत केवळ १५ ते २० टक्के क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या होत्या. परंतु, एक जुलैपासूनच संपूर्ण राज्यात दमदार पाऊस झाल्याने शंभर टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. सध्या भात व नागली पिकांच्या पुनर्लागवडीची कामे जोमाने सुरु असून, अन्य पिकांच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. बाजरी, मुग, उडीद आणि भुईमूग पिक वाढीच्या आवस्थेत असून, फुलोरा धरला आहे. परंतु, राज्यात काही भागात सततच्या पावसामुळे पिकांमध्ये पाणी साचले असून, कडधान्य पिक पिवळी पडू लागली आहेत.
राज्यात कोकण विभागात ४.८७ लाख हेक्टर क्षेत्र खरीपाखाली असून, आतापर्यंत ४.०१ लाख हेक्टर म्हणजे ८२ टक्के क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. कोकण विभागामध्ये भात आणि नाचणीची पुनर्लागवडीचे काम अंतिम टप्प्यात आहे. नाशिक विभागामध्ये आता पर्यंत ९७ टक्के क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत.येथे मुग व उडिद पिकांची स्थिती चांगली आहे. जळगांव जिल्ह्यात अति पावसामुळे पिके काही प्रमाणात धोक्यात आली आहेत. पुणे विभागामध्ये ७.३९ लाख हेक्टर क्षेत्र खरीपा खाली असताना चांगल्या पावसामुळे १०.३७ लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजे १४० टक्के पेरण्या झाल्या आहेत.कोल्हापूर विभागामध्ये १०८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून, तूर व सूर्यफुल पिकांची वाढ चांगली आहे. दरम्यान सोयाबिन पिकावर केसाळ अळी व पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. (प्रतिनिधी)