वालचंदनगर-जंक्शन रस्त्यावर खड्डेच खड्डे
By admin | Published: September 24, 2016 01:17 AM2016-09-24T01:17:37+5:302016-09-24T01:17:37+5:30
जंक्शन ते वालचंदनगर रस्त्यावर असंख्य खड्डे पडल्याने रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, अशी अवस्था निर्माण झालेली आहे.
वालचंदनगर : जंक्शन ते वालचंदनगर रस्त्यावर असंख्य खड्डे पडल्याने रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, अशी अवस्था निर्माण झालेली आहे. खड्ड्यात तळ्यासारखे पाणी साठल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप आलेले आहे.
या रस्त्याने प्रवास करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून तारेवरची कसरत करण्याची वेळ येत आहे. या ७ किलोमीटर रस्त्याची गेल्या दोन वर्षांपासून खड्ड्यामुळे चाळण झालेली आहे. मात्र, अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे मोठ्या अपघाताला सामोरे जाण्याची वेळ येथील शालेय विद्यार्थ्यांना, नागरिकांना व प्रवाशांना येणार आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी याच रस्त्यासाठी २२ कोटी मंजूर झाल्याचे वल्गना करून कामाला सुरुवात करण्यासाठी पुढाऱ्यांनी जंक्शन चौकात नारळ फोडून उद्घाटन केले. मात्र, दोन वर्षांत एक टोपली खडीही येऊन पडलेली नसल्याने येथील नागरिकांचा पुढाऱ्यांवरील विश्वास उडाला आहे.
हा ७ किलोमीटरचा रस्ता शालेय विद्यार्थ्यांचा व प्रवाशांचा विचार करून मजबूतीकरण करण्यात यावा, अशी मागणी प्रवासातून रणगाव, रामवाडी, शिवाजीनगर, लासुर्णे, जंक्शन, वालचंदनगर परिसरातील नागरिकांनी केली आहे.