Coronavirus: खेडमध्ये पाच लहान मुले कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 05:15 PM2021-06-28T17:15:35+5:302021-06-28T17:16:58+5:30
खेड तालुक्यातील सुसेरी गावात २ ते १४ वयोगटातील ५ लहान मुले कोरोना बाधित झाल्याचा प्रकार शनिवारी रात्री उघडकीला आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
खेड : तालुक्यातील सुसेरी गावात २ ते १४ वयोगटातील ५ लहान मुले कोरोना बाधित झाल्याचा प्रकार शनिवारी रात्री उघडकीला आला. तालुक्यातील कोरेगाव ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सुसेरी नं. १ या गावातील एकाच वाडीतील ५ लहान मुलांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर तालुका आरोग्य यंत्रणा सावध झाली आहे. ग्रामीण भागात लहान मुले कोरोना बाधित झाल्याने प्रशासनासमाेर चिंता वाढली आहे.
सुसेरी नं. १ येथील एका कुटुंबातील पती -पत्नी हे कोरोना बाधित सापडल्याने त्यांच्या कुटुंबातील उर्वरित सदस्यांची अँटिजन तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये पाच लहान मुले बाधित सापडली आहेत. यामध्ये एक मुलगी तर ५, ७, ९ व १४ वयाची मुले आहेत. या पाचही मुलांना प्रशासनाने खेड शहरातील शिवतेज कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना कोरेगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. नितीन मोरे यांनी सांगितले की, ही या पाचही लहान मुलांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नसून त्यांची प्रकृती स्थिर आहे. डेल्टा प्लसच्या अनुषंगाने या पाच मुलांची पुढील तपासणी आरोग्य विभाग करणार का? हे पाहणे महत्वाचे आहे.
कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील गावामध्ये सध्या ६६ रूग्ण कोरोनाबाधित असून त्यातील २५ रूग्ण गृह अलगीकरणात असून, उर्वरीत ३५ रूग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. तर गेल्या मार्च महिन्यापासून या प्राथमिक आरोग्य केंद्रात अंतर्गत ६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आरोग्य केंद्रात अंतर्गत ३५०६ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.