खेर्डा गावात लागलेत शहीदांसाठी दिवे !
By admin | Published: October 31, 2016 05:03 PM2016-10-31T17:03:31+5:302016-10-31T17:03:31+5:30
देशाच्या रक्षणार्थ लढणा-या सैनिकांसाठी दिवाळी उत्सवात दिवा लावण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा येथील ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला
Next
>जयदेव वानखडे / ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 31 - देशाच्या रक्षणार्थ लढणा-या सैनिकांसाठी दिवाळी उत्सवात दिवा लावण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा येथील ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. दिवाळीच्या दिवशी घरोघरी ‘एक दिवा शहीदांसाठी’ लावण्यात आला असून रांगोळी तसेच फुलांच्या आरासांनी सैनिकांच्या कतृत्वाला नमन करण्यात आले आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमामधून सैनिकांसाठी एक दिवा लावण्याचे आवाहन केले होते. त्याचप्रमाणे सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही ‘शहीदांसाठी लावा एक दिवा’ असा संदेश गत तीन-चार दिवसांपासून सर्वत्र पोहचला होता. दरम्यान जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा येथील ग्रामस्थांनी ही दिवाळी देशासाठी हुतात्म्य पत्करलेल्या शहीदांसाठी तसेच सिमेवर लढणाºया सैनिकांसाठी साजरी करण्याचा निर्णय घेतला. अशातच भारत-पाक सिमेवर सांगली जिल्ह्यातील २८ वर्षीय नितीन सुभाष कोळी या वीर जवानाला वीरगती प्राप्त झाली. त्यामुळे गावातील प्रत्येक नागरिकाने शहीदांसाठी एक दिवा लावण्याचे आवाहन येथील ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ जाधव यांनी केले. ग्रामस्थांनीही दिवाळीच्या दिवशी प्रत्येक घरी ‘शहीदांसाठी एक दिवा’ लावूनच दिवाळी साजरी केली. त्याचप्रमाणे जय जवान जय किसान, भारत माता की जय, सैनिकांच्या कतृत्वाला सलाम अशा प्रकारचा संदेश रांगोळी आणि फुलांची आरास तयार करुन देण्यात आला. अशा प्रकारे शहीदांना स्मरण करुन खेर्डा गावात अनोखी दिवाळी साजरी करण्यात आली.